राजकारण

कोण राजा; आज कोणाचा वाजणार बाजा

      बुलढाणा (प्रतिनिधी) :- बुलढाण्यासह दहा नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी २ डिसेंबरला, तर २० डिसेंबरला देऊळगाव राजा नगर परिषदेकरिता मतदान झाले. दहा नगरपालिकांच्या नगराध्यक्ष व नगरसेवकपदाचे निकाल देऊळगाव राजामुळे पुढे ढकलल्याने तब्बल अठरा दिवसांची दीर्घ प्रतीक्षा उमेदवारांना करावी लागली. आपले काय होणार? या विचाराने उमेदवारांच्या झोपा उडाल्या. आता काही तासांचा अवधी मतमोजणीसाठी बाकी असल्याने पुन्हा एकदा नगराध्यक्षपदाच्या ८७ आणि नगरसेवकासाठीच्या ११७३ उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली आहे. उद्या २१ डिसेंबर रोजी मतमोजणीअंती निकाल जाहीर होणार असून, नगराध्यक्षपदाच्या खुर्चीचा राजा किंवा राणी कोण? आणि मतदारांनी कोणाचा बाजा वाजवला, याचा फैसला होईल.
बुलढाणा, चिखली, सिंदखेड राजा, मेहकर, लोणार, खामगाव, शेगाव, नांदुरा, जळगाव जामोद, मलकापूर या नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले. देऊळगाव राजा नगर परिषदेचे मतदान लांबणीवर पडले. राज्यात अनेक ठिकाणी २० डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आल्याने ज्या पालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली, त्यांचेही निकाल २१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आले. त्यामुळे नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांमध्ये नाराजी पसरली होती. अनेकांनी या निर्णयावर टीका केली. परंतु निवडणूक आयोगाच्या आदेशापुढे कुणाचे काही चालत नसल्याने उमेदवारांना गप्प बसावे लागले.
बुलढाणा नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी ७, नगरसेवकांच्या १२४ उमेदवारांमध्ये निवडणूक झाली. चिखलीत १३ नगराध्यक्ष, तर ११३ नगरसेवकपदाच्या उमेदवारांमध्ये लढत झाली. देऊळगाव राजा नगराध्यक्ष ३, नगरसेवक ७७, जळगाव जामोद नगराध्यक्ष ३, नगरसेवक ८५, खामगाव नगराध्यक्ष ६, नगरसेवक १३९, लोणार नगराध्यक्ष ८, नगरसेवक ९५, मलकापूर नगराध्यक्ष १०, नगरसेवक १२५, मेहकर नगराध्यक्ष ७, नगरसेवक १३१, नांदुरा नगराध्यक्ष ९, नगरसेवक ९४, शेगाव नगराध्यक्ष १३, नगरसेवक ११७ आणि सिंदखेड राजात नगराध्यक्षपदाच्या ६ व नगरसेवकपदाकरिता ७० उमेदवारांनी निवडणूक लढविली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *