म्हसला येथे मंजूर ३३/११ के.व्ही. उपकेंद्राचे काम रखडले
बुलढाणा,प्रतिनिधी: तालुक्यातील म्हसला येथे जवळपास दोन वर्षांपूर्वी नवीन ३३/११ के.व्ही.उपकेंद्रास मंजुरी मिळाली आहे. या उपकेंद्रासाठी आवश्यक जागेचे अधिग्रहणही पूर्ण झालेले असतानाही, आजतागायत प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली नाही. त्यामुळे परिसरातील शेतकरी ओव्हरलोडच्या समस्येने कमालीचे त्रस्त झाले आहेत.
उपकेंद्राचे काम रखडल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना विद्युत ओव्हरलोडच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. वारंवार वीज खंडित होणे, कमी दाबाने वीजपुरवठा होणे याचा थेट परिणाम शेतीपंपांवर होत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
सध्या अस्तित्वातील वीजयंत्रणा अपुरी पडत असून नवीन उपकेंद्र कार्यान्वित झाल्यास या भागातील वीजपुरवठा सुरळीत होऊन शेतीसह ग्रामस्थांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे मंजूर उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांकडून होत आहे.
शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात
दरम्यान,शेतकरी कधी ओल्या तर कधी कोरड्या दुष्काळामुळे तर कधी शासनाच्या धोरणांमुळे होरपळल्या जात आहे. शासन, प्रशासनाकडून जणुकाही शेतकऱ्यांची थट्टाच सुरू आहे. त्यातच म्हसला परिसरातील शेतरीकरी ओव्हरलोडच्या समस्येला वैतागला आहे. हा प्रश्न तत्काळ निकाली न निघाल्यास शेतकरी तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

