सीसीआयकडे कापूस विक्री नोंदणीसाठी ३१ डिसेंबर अंतिम मुदत
मलकापूर, प्रतिनिधी : भारतीय कपास निगम लिमिटेड (सीसीआय) मार्फत शासकीय आधारभूत किमतीने कापूस विक्री करायची असल्यास कपास किसान मोबाइल ॲपद्वारे नोंदणी करणे अनिवार्य असून, या नोंदणीची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२५ आहे. यानंतर कोणत्याही परिस्थितीत नोंदणीची मुदत वाढवली जाणार नसल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी तातडीने आणि विहित मुदतीत नोंदणी पूर्ण करावी, असे महत्त्वाचे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने बाजार समितीचे सभापती संजय काजळे व सचिव राधेश्याम शर्मा यांनी संयुक्तरीत्या केले आहे.
शासनाच्या आधारभूत किंमत योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी ही एकमेव अधिकृत प्रक्रिया असून, नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांचा कापूस सीसीआयकडून खरेदी केला जाणार नाही. सध्या कापसाच्या बाजारभावात मोठी अस्थिरता असून, खासगी बाजारात दरांमध्ये मोठा फरक दिसून येतो. अशा परिस्थितीत शासकीय हमीभाव हा शेतकऱ्यांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्याय ठरतो. मात्र मागील अनुभव पाहता अनेक शेतकरी माहिती अभावी, तांत्रिक अडचणींमुळे किंवा वेळेअभावी नोंदणी करू शकत नाहीत आणि नंतर अडचणीत सापडतात. हीच बाब लक्षात घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीने वेळेत इशारा देत शेतकऱ्यांना सतर्क केले आहे. कपास किसान मोबाईल ॲपवर नोंदणी करताना शेतकऱ्यांनी आधार कार्ड, बँक खाते तपशील, सातबारा उतारा, पिकाची माहिती व संपर्क क्रमांक अचूकपणे नोंदवणे आवश्यक आहे. चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यास नोंदणी नाकारली जाऊ शकते, याची दक्षता घ्यावी, असेही समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
बाजार समितीाशी संपर्क साधावा
नोंदणी प्रक्रियेदरम्यान अडचणी येत असल्यास शेतकऱ्यांनी थेट कृषी उत्पन्न बाजार समितीाशी संपर्क साधावा. बाजार समिती शेतकऱ्यांना
आवश्यक ते मार्गदर्शन व सहकार्य करण्यास सज्ज असल्याचे सभापती संजय काजळे व सचिव राधेश्याम शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.
नोंदणी प्रक्रिया निर्णायक
कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही नोंदणी प्रक्रिया अत्यंत निर्णायक असून, ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम आणि शेवटची संधी लक्षात घेता कोणताही शेतकरी शासकीय आधारभूत किमतीच्या लाभापासून वंचित राहू नये, असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

