स्मार्ट बुलढाणा

धाडच्या चायनीज सेंटर्सला अस्वच्छतेची मीठी!

अभिनय बोर्डे
बुलढाणा,(प्रतिनिधी) : शहरांप्रमाणे धाडनगरीतही सध्या खाऊगल्लीला बऱ्यापैकी ऊत आला आहे. यात चायनीज सेंटरचा बोलबाला अधिक आहे. जागोजागी थाटलेल्या या चायनीज दुकानांनी मात्र स्वच्छतेचे सर्व नियम धाब्यावर बसवले आहेत. याठिकाणी नागरिकांच्या आरोग्याशी उघडपणे खेळल्या जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. उघड्यावरील मांस, काळवंडलेले तेल आणि अस्वच्छ प्लेट्समुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नव्हेतर येथील अस्वच्छता आजारांना खुले आव्हान ठरत आहे.
       या ठिकाणी सुरू असलेल्या काही चायनीज सेंटर्सधारक चिकन लॉलीपॉप आणि इतर मांसाहारी पदार्थ थेट उघड्यावर लटकवून ठेवतात. या पदार्थांवर दिवसभर उडणारी धूळ, वाहनांचा धूर आणि माश्या बसत असून हे दूषित मांस कोणत्याही प्रक्रियेविना थेट शिजवून ग्राहकांना खाऊ घातले जात आहे. यामुळे अन्नातून विषबाधा होण्याचा धोका बळावला आहे. याठिकाणी वापरले जाणारे खाद्यतेल वारंवार गरम केल्याने ते पूर्णपणे काळवंडले असते. त्यातून उग्र दुर्गंधी येते. या दुकानांच्या परिसरात अन्नपदार्थांचे अवशेष, कचरा आणि सांडपाणी साचल्याने तिथे डुकरांचा आणि मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. ग्राहकांना खाण्यासाठी दिले जाणारे पदार्थ ज्या प्लेट्समधून दिले जातात,त्या प्लेट्स देखील मळलेल्या आणि अस्वच्छ टबमधील पाण्यात बुडवून पुन्हा वापरल्या जात आहेत. यामुळे संसर्गजन्य आजार आणि पोटाचे विकार जडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रशासकीय दुर्लक्ष
सुरू असलेला हा सावळा गोंधळ सर्वसामान्यांना दिसतो, मात्र ‘अन्न व औषध प्रशासन’ आणि स्थानिक प्रशासनाला दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. महेवारीच्या वसुलीसाठी येणाऱ्या संबंधित विभागाचे अधिकारी या दुकानांची तपासणी करून दोषींवर कारवाई करण्याचे धाडस दाखवतील काय?, असा सवालही उपस्थित केल्या जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *