शेतशीवार

ॲग्रोटेक -२५ प्रदर्शनी ठरतंय लक्षवेधी!

अकोला,(प्रतिनिधी) :
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (अकोला) कृषी विभाग महाराष्ट्र शासन व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन प्रकल्प (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय कृषि क्रांतीचे प्रणेते, कृषी रत्न आणि स्वतंत्र भारताचे प्रथम कृषि मंत्री, महामानव डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२७ व्या जयंती उत्सवानिमित्त कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर आयोजित ॲग्रोटेक २०२५ च्या तीन दिवसीय कृषीप्रदर्शनीच्या दुसऱ्या दिवशी ४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. आज २९ डिसेंबर २५ प्रदर्शनीचा शेवटचा दिवस असल्याने गर्दी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
          अग्रोटेक २०२५ मध्ये ५ भव्य डोम उभारण्यात आले असून पहिल्या डोम मध्ये कृषी विद्यापीठांची विविध शोभिवंत, आकर्षक आणि मनमोहक पुष्पांची प्रदर्शनी कौशल्यपूर्ण अशा जिवंत बोन्साय व ॲड नियम प्रकारांच्या नमुन्यांसह थाटण्यात आली आहे. द्वितीय डोममध्ये विद्यापीठाच्या विविध विभागांची तंत्रज्ञान दालने आकर्षक रितीने प्रदर्शित करण्यात आली आहेत. यामध्ये, विशेषत: एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, शास्त्रोक्त अशा अतीघन पद्धतीचे कापूस लागवड तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यात आले आहे. विषमुक्त शेतीला अधिक प्रोत्साहन देत नैसर्गिक शेतीचा तसेच सेंद्रिय शेती पद्धतीचा पुरस्कार करून विषमुक्त शेती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
            प्रदर्शित प्रमुख दालनांपैकी नैसर्गिक शेती संशोधन केंद्र, कृषिविद्या विभाग डॉ. पं.दे.कृ.वि., अकोला यांच्या दालनात डॉ. ए. बी चोरे, विभाग प्रमुख तथा प्रमुख शास्त्रज्ञ यांच्या नेतृत्वात शासनाच्या धोरणानुसार पिकांचा उत्पादन खर्च कमी करून विषमुक्त अन्ननिर्मिती आणि पर्यावरण पुरक शेतीसाठी नैसर्गिक शेती पद्धतीवर भर देत गांडूळ खत व गांडूळ पाणी तयार करण्याची शास्त्रोक्त पद्धत व वापर, कंपोस्ट खत निर्मितीच्या विविध पद्धती, हिरवळीची खते व पिकांच्या फेरपालटांचे महत्व, जैविक खते, जैविक कीड नाशके व बुरशीनाशके, फास्पोकंपोस्ट तयार करण्याची पद्धत, जीवामृत, घनजीवामृत, पंचगव्य, अग्नीअस्त्र, निमास्त्र, आणि दशपर्णी अर्क तयार करण्या साठी लागणारे साहित्य व निर्मितीची कृती पद्धती, आंतरपीक पद्धती, पिकांचे रुंद सरी वरंबा पद्धतीने लागवड तंत्रज्ञान व त्याचे फायदे आणि कामगंध सापळे, पिवळे व निळे चिकट सापळे व फळमाशी सापळे आदी फायदेशीर तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यात आले आहे.
           याशिवाय शेतकरी ग्राहकांच्या सोयीसाठी कोथिंबीर, गांडूळखत आणि जैविक कीड व बुरशीनाशके विक्री साठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच सेद्रीय पद्धतीने उत्पादित विषमुक्त अन्नधान्य विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलेले आहे.अखिल भारतीय समन्वयीत एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्पाच्या दालनामध्ये डॉ. जे. पि.देशमुख, मुख्य कृषी विद्यावेत्ता यांच्या मार्गदर्शनाखाली निसगार्चा लहरीपणा लक्षात घेता केवळ एकाच पीक पद्धतीवर अवलंबून न राहता शेती संबंधित पूरक व्यवसायातून शाश्वत उत्पन्न कसे मिळवता येईल या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या १.० हे.क्षेत्रावरील मॉडेलची जिवंत प्रतिकृती अत्यंत लक्षवेधी ठरत आहे. ज्यायोगे विविध पिकांचे व त्यावरील आधारित शेतीपूरक उद्योगधंद्यांचे क्षेत्रनिहाय अचूक नियोजन दर्शविलेले आहे. सदर तंत्रज्ञानाला शेतकऱ्यांच्या पसंती लाभत आहे.
         अ.भा.स.कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पा अंतर्गत मुख्य शास्त्रज्ञ डॉ.अनिता चोरे यांच्या मार्गदर्शनात कोरडवाहू शेतीसाठी फायदेशीर तंत्रज्ञान नमुन्यांच्या माध्यमातून प्रात्यक्षिकासह शेतकऱ्यांसाठी प्रदर्शित करण्यात आले आहे. विभागीय कृषी संशोधन केंद्र (अमरावती) च्या दालनामध्ये डॉ.सतीश निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली विदभार्तील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन या तेलवर्गीय पिकाचे विद्यापीठाद्वारे संशोधित केलेले व शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले अंबा व सुवर्णसोया यासह इतर वाणांचे नमुने प्रदर्शित करण्यात आले आहे. कडधान्य संशोधन विभागाव्दारे डॉ.आर.बि. घोराडे यांच्या मार्गदर्शनात शेतकऱ्यांना उपयुक्त असे वाण व त्यांचे लागवड तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यात आले आहे. गहू संशोधन केंद्राच्या दालनामध्ये डॉ.स्वाती भराड, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ यांच्या मार्गदर्शनात गव्हाचे अधिक उत्पादन देणारे वाण प्रदर्शित करण्यात आले आहे. कीटकशास्त्र विभागाच्या दालनामध्ये डॉ.डी.बी. उंदिरवाडे यांच्या मार्गदर्शनात विविध जैविक कीड व्यवस्थापन सामग्री यामध्ये प्रामुख्याने ट्रायकोग्रामा, घाटे अळीचा विषाणू, निंबोळी अर्क निर्मितीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले आहे.
        कृषी तंत्रज्ञानाचा साक्षात कुंभमेळा ठरत असलेल्या या बहुपयोगी स्वरुपाच्या कृषी प्रदर्शनीचा उद्या शेवटचा दिवस असून या लक्षवेधी प्रदर्शनाला शेतीविषयी आस्था व आत्मीयता असणाऱ्या सर्वांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.शरदराव गडाख यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *