स्मार्ट बुलढाणा

‘फिरत्या एकादशी’च्या दिंडीतून धर्माचा जागर!

धाड,(प्रतिनिधी)
‘अवघा रंग एक झाला’… अशा भक्तिमय वातावरणात आज ३१ डिसेंबर रोजी धाड येथे आषाढी-कार्तिकी पौर्णिमेनिमित्त विठ्ठल नामाच्या जयघोषात भव्य दिंडी सोहळा उत्साहात पार पडला. टाळ-मृदंगाचा कडकडाट आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या गजराने संपूर्ण धाडनगरी भक्तीच्या रसात न्हाऊन निघाली. विशेष म्हणजे, खंडित झालेली ही वारकरी परंपरा गेल्या २९ वर्षांपासून रामभरोसे भजनी मंडळ आणि कार्तिक एकादशी दिंडी समूहाने पुन्हा जिवंत केली आहे.
पहाटेच गुंजतोय विठ्ठल नामाचा गजर आणि टाळ-मृदंगाचा नाद
सराफा गल्लीस्थित सिद्धिविनायक गणेश मंदिरातून पहाटे ५.१५ वाजता या दिंडीचा प्रारंभ होतो. विणेकरी गजानन जाधव हे विणा धारण करतात, तर मृदंगाचार्य गोविंदा जाधव यांच्या हातातील मृदंगाच्या थापेवर वारकरी तल्लीन होऊन या दिंडीत नाचतात. ही दिंडी गावातील मुख्य मार्गावरून म्हणजे सोनार गल्ली, कुंभार गल्ली, मारुती मंदिर, धर्मजागृती चौक, तेली गल्ली आणि ग्रामपंचायत गल्लीमार्गे मार्गस्थ होते तेव्हा, ठिकठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने दिंडीचे दर्शन घेतले जाते. दिंडी परत सिद्धिविनायक गणेश मंदिरावर पोहोचल्यानंतर सदर ठिकाणी महाआरती आणि मनोहारी पावली खेळून समारोप करण्यात येतो.
या दिंडीच्या यशस्वीतेसाठी संजय वाघ, रामदास सणांसे, विनोद खडके, राजू देशपांडे, सचिन जोशी, गोटू कुटे, विठ्ठल शिंदे, विनोद गायकवाड, भिका उबाळे, आदिनाथ डुकरे, बबन घ्यायवट, ज्ञानेश्वर सिरसाट, दादाराव चिंचोले, बंडू देशपांडे, किशोर पंडित, वैभव देशपांडे, सुरेश घाडगे आणि भारत गाडेकर यांसह अनेक ग्रामस्थ परिश्रम घेत आहे. हिंदू संस्कृतीचे जतन करणे आणि आजच्या बाल गोपाळांवर धार्मिक संस्कार घडवणे हाच या दिंडीचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमामुळे गावातील एकोपा वाढीस लागला आहे.
बंद पडलेला हा दिंडी उपक्रम दिवंगत रामेश्वर इंगळे यांच्यासह गोविंदा जाधव, शालिग्राम वावधणे, दिलीप शिंदे व अनेक विठ्ठल भक्तांनी १९९६ मध्ये सुतारगल्लीतून पूर्ववत सुरु केली. अनेक वर्षे सुतारगल्लीतून निघारी ही दिंडी गेले चार वर्षे वॉर्ड क्रमांक दोन मधील हनुमान मंदिरावरून काढण्यात आली. तर गेल्या काही महिन्यांपासून आता सराफा गल्लीस्थित सिद्धिविनायक गणेश मंदिरावरून निघत आहे. काही महिन्यांनंतर सदर दिंडी क्रमवारीनुसार गावातील अन्य मंदिरांसमोरून काढणार असल्याचा मनोदय आयोजकांनी व्यक्त केला. दर पंधरा दिवसाला म्हणजेच ‘फिरत्या एकादशीला’ ही दिंडी काढली जात असल्याने गावातील आध्यात्मिक वातावरण टिकून आहे.
                                                         ठाकरे परिवाराकडून जंगी स्वागत
३१ डिसेंबर रोजी म्हणजे पुत्रदा एकादशीदिनी नेहमीप्रमाणे निघालेल्या या ठाकरे परिवाराकडून जंगी स्वागत करण्यात आले. लीना ठाकरे, सुरेखा ठाकरे व कोलम ठाकरे यांनी दिंडीत सहभागी विठ्ठल भक्तांना औक्षण करून त्यांचे दर्शन घेण्यात आले. त्यानंतर शेषराव ठाकरे यांनी दिंडी सहभागी प्रत्येक वारकऱ्यांना मानाचा रुमाल व टोपी देऊन त्यांचे स्वागत केले. नारायण वाघुर्डे, भरत गाडेकर, प्रिती गाडेकर, कल्पना वाघुर्डे आणि ओम ठाकरे यांनी देखील पूजन केले. यावेळी वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *