स्मार्ट बुलढाणा

काळाची झडप! मलकापूरात आयशरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू 

अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी): नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मलकापूर शहरात तरुणावर काळाने झडप घातली. नांदुरा रोडवरील मातोश्री जिनिंगसमोर भरधाव आयशर ट्रकने दुचाकीला समोरासमोर धडक दिली. या अपघातात देवधाबा येथील ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. १ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली.
देवधाबा (ता.मलकापूर) येथील रहिवाशी असलेला प्रविण संतोष कवळे हा तरुण आपल्या हिरो एचएफ डिलक्स दुचाकीने क्रमांक एमएच-२८-एव्ही-३०४६ हायवेवरील सर्विस रोडने जात होता. त्यावेळी मातोश्री जिनिंग समोर कापसाने भरलेले आयशर मालवाहू वाहन क्रमांक एमएच-२८-बीएच-४२४३ ने रॉंग साईडने येऊन प्रविण कवळे याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत प्रविण कवळे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर जखमीला मदत करण्याऐवजी आयशर चालक आपल्या वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून आरोपी चालकास अटक करण्याची मागणी होत आहे. या अपघातामुळे देवधाबा परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी मृतकाचा भाऊ गणेश संतोष कवळे यांनी मलकापूर शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आयशर चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम २८१, १०६, १२५ (ए), मोटार वाहन कायद्याचे कलम १३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस अंमलदार सविता मोरे ह्या करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *