स्मार्ट बुलढाणा

‘बावन बुरजी’ संवर्धनासाठी लोकचळवळ!

बुलडाणा,(प्रतिनिधी) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टम पत्नी महाराणी गुणवंताबाई यांचे माहेर असलेले चिखली तालुक्यातील करवंड गाव आता एका मोठ्या ऐतिहासिक क्रांतीसाठी सज्ज झाले आहे. येथील ऐतिहासिक ‘बावन बुरजी’ गढीच्या संवर्धनासाठी ‘बावन बुरजी (करवंड) बचाव कृती समिती’च्या माध्यमातून भव्य लोकचळवळ उभी राहिली असून येत्या १५ एप्रिल २०२६ रोजी भव्य ‘करवंड महोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे.

इतिहासाचे साक्ष देणारी करवंड येथील बावन बुरजी गढी हा महाराष्ट्राच्या इतिहासाचा सुवर्णाक्षरांनी लिहिलेला गेलेला एक अनमोल ठेवा आहे. मात्र, प्रशासकीय दुर्लक्ष आणि देखभालीअभावी हा वारसा संकटात सापडला आहे. हा वारसा जतन करण्यासाठी जिल्ह्यातील इतिहासप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत ‘बचाव कृती समिती’ स्थापन केली असून समितीने स्वाक्षरी मोहीम राबवून जनमत तयार करण्यास प्रारंभ केला आहे.

बावन बुरजी व परिसराचे तातडीने संरक्षण करणे, पुरातत्त्व विभागाकडून या स्थळाची अधिकृत नोंद करून घेणे, ऐतिहासिक वारसा स्थळ म्हणून गावाचा सर्वांगीण विकास आराखडा तयार करणे आणि शैक्षणिक व पर्यटनदृष्ट्या या स्थळाला जागतिक नकाशावर आणणे, हे समितीचे उद्दिष्ट असून ही महाराष्ट्राच्या ऐतिहासिक अस्मितेची लढाई आहे.

४ जानेवारीला नियोजन बैठक

१५ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या ‘करवंड महोत्सवाच्या’ पूर्वतयारीसाठी येत्या ४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजता हरी रुद्र राजे इंगळे यांच्या निवासस्थानी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत महोत्सवाचे स्वरूप आणि संवर्धनाच्या पुढील दिशा ठरवली जाणार आहे. सर्व शिवप्रेमी, इतिहास अभ्यासक आणि नागरिकांनी बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन या चळवळीचे संकल्पक सुनील जवंजाळ पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *