महाराष्ट्र माझा

गालबोट: साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या तोंडाला काळे फासले

कोल्हापूर,(प्रतिनिधी) : कोल्हापूरमध्ये मोठ्या उत्साहात सुरू असलेल्या साहित्य संमेलनाला आज दुपारी चांगलेच गालबोट लागले. संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर आंदोलक संदीप जाधव यांनी अचानक शाईफेक करत त्यांच्या तोंडाला काळे फासले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे संमेलन परिसरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.

कोल्हापूरस्थित या साहित्य संमेलनाला सुरक्षा होती. सुरक्षा यंत्रणेची नजर चुकवून जाधव यांनी संमेलनात प्रवेश केला आणि थेट विनोद कुलकर्णी यांना गाठले. नव्हेतर त्यांच्यावर शाईफेक केली. संमेलनाच्या नियोजनाबाबत किंवा अन्य काही मुद्द्यांवरून हे आंदोलन करण्यात आल्याची प्राथमिक चर्चा आहे.

या घटनेत वापरण्यात आलेल्या शाईमध्ये काही घातक रसायने असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या शाईमुळे विनोद कुलकर्णी यांना तात्काळ श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे उपस्थितांनी त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात हलविले.

घटनेनंतर शाहूपुरी पोलिसांनी आंदोलक संदीप जाधव यांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. या कृत्यामागील नेमका उद्देश काय होता, हे समजू शकले नसून पोलिसांचा तपास सुरू आहे. दरम्यान, साहित्य वर्तुळातून या घटनेचा तीव्र निषेध केला जात असून असे कृत्य करणे चुकीचे असल्याची भावना व्यक्त होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *