स्मार्ट बुलढाणा

बापरे! कमळजा मातेच्या मुखवट्यापर्यंत पोहोचले पाणी

बुलढाणा,(प्रतिनिधी): लोणार सरोवरातील पाण्याची दिवसेंदिवस वाढत जाणारी पातळी धोक्याचा इशारा देत आहे. कमळजा मातेच्या मुखवट्याला वाढलेल्या पाण्याचा स्पर्श झाला असून, येत्या एक, दोन महिन्यात मुखवटाही बुडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
१५ डिसेंबरला घेतलेल्या माहितीनुसार कमळजा मातेचे मंदिर बाहेरून पाच ते सहा फुटापर्यंत बुडाले होते. तर मंदिरातील गाभाऱ्यातही तीन ते चार फूट पाणी आले होते. आता पंधरा ते वीस दिवसांत पुन्हा फूटभर वाढलेल्या जलपातळीने थेट कमळजा मातेच्या मुखवट्याला अभिषेक घातल्याचे दिसून येत आहे. वाढणारी जलपातळी चिंतेचा विषय ठरली आहे.
जलपातळीत झपाट्याने का वाढ होतेय, याबाबत अद्याप संशोधन झाले नाही. काठावरील विराज धारतीर्थ येथील गोमुखातून अखंड पाण्याची धार कोसळत राहते. हे पाणी सरोवरात जाते. तर सरोवरामधील रामगया येथील झरा, सीतान्हानी आणि पापहेरश्वर कुंडाजवळून झरे मोठ्या प्रवाहाने वाहून सरोवरात जात आहेत. शासनाने वेळीच दखल घेऊन वाढती जलपातळी रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात आणि पाण्याखाली जाण्याच्या शक्यतेपासून कमळजा मातेचे मंदिर वाचवावे, अशी मागणी भाविक तथा लोणार शहरवासीयांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *