स्मार्ट बुलढाणा

धाड-बुलढाणा मार्गावर बसफेऱ्यांचा दुष्काळ

अभिनय बोर्डे
धाड,(प्रतिनिधी) : तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धाड परिसरातून बुलढाणा येथे जाणाऱ्या प्रवाशांना सध्या नरकयातना सोसाव्या लागत आहेत. बसफेऱ्यांची कमतरता, प्रवाशांना तासन् तास करावी लागणारी प्रतीक्षा, बसस्थानकावरील वाढती गुन्हेगारी आणि मुलभूत सुविधांचा अभाव यामुळे प्रवाशी चांगलेच वैतागले असून तीव्र संताप व्यक्त होत आहेत.
धाड ते बुलढाणा या मार्गावर बसफेऱ्यांची संख्या अत्यंत तोकडी आहे. प्रवाशांना एका बससाठी तब्बल १ ते १.५ तास ताटकळत उभे राहावे लागते. विशेषतः दुपारी १२ ते ३ या वेळेत बसची भीषण टंचाई निर्माण होते. एखादी बस आलीच, तर ती तुडुंब भरलेली असते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.
बसफेऱ्या कमी असल्याने स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी उसळते. याच गर्दीचा फायदा घेत खिसेकापूंनी आपला मोर्चा धाड बसस्थानकाकडे वळवला आहे. प्रवाशांचे मोबाइल आणि रोख रक्कम चोरीला जाण्याचे प्रकारही याठिकाणी घडत आहेत. सोबतच टवाळखोरांचा उपद्रव देखील वाढला आहे. त्यामुळे याठिकाणी कायमस्वरूपी पोलीस अंमलदार तैनात करण्याची देखील गरज आहे.नव्हेतर अशी मागणी महिला वर्गातून होत आहे. एकंदरीत धाड बसस्थानकाची अवस्था सध्या असून अडचण आणि नसून खोळंबा, अशी झाली आहे. प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नाही. स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था असून दुर्गंधीमुळे महिला आणि बालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या वर्षभरापासून बसस्थानकाचे बांधकाम सुरू असून ते अद्याप पूर्ण झालेले नाही. अर्धवट बांधकामामुळे प्रवाशांना बसण्यासाठी जागा नाही. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ बसफेऱ्या वाढवाव्यात, याठिकाणी पोलीस चौकीचे निर्माण करावे आणि बसस्थानकाचे रखडलेले काम पूर्ण करावे,अशी मागणी होत आहे.
उद्रेकाची शक्यता
वाढत्या सुविधांमुळे प्रवाशांचा संयम सुटला आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच पावले उचलण्याची गरज आहे. असे न झाल्यास प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, हे तितकेच खरे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *