क्राईम जगत

सोनाळ्यात पत्नीचा खून; पतीस जन्मठेप

संग्रामपूर,(प्रतिनिधी): मोठ्या थाटामाटात कुटुंबिय आणि सगे-सोयऱ्यांच्या उपस्थित लग्न केले. अग्नीदेवतेला साक्ष ठेऊन सात जन्म राहण्याचे वचनही पत्नीला दिले. मात्र, त्याच पतीने आपल्या पत्नीचा निर्घुण खून करत आपल्याच हाताने आपल्याच संसाराची राखरांगोळी केली. १९ ऑक्टोबर २०२० मध्ये सोनाळ्यात घडलेल्या या हत्याकांड प्रकरणी खामगाव येथील न्यायालयाने ९ जानेवारी रोजी आरोपी पतीस आजन्म कारावास आणि पाच हजार रुपयांाच दंड, दंड न भरल्यास पुन्हा एक वर्षाचा सश्रम कारावास, अशी शिक्षा ठोठावली.
सोनाळा येथील रहिवासी असलेल्या मिराबाई मिलावेकर यांचा मृतदेह मिळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी ओमप्रकाश खंडेलवाल यांनी १९ ऑक्टोबर २०२० रोजी दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणात सुरुवातीला मर्ग दाखल करण्यात आला होता. तपासाअंती नानकराम उर्फ राजाराम उर्फ गणेश दयाळु मिलावेकर (रा.सोनाळा) याने बांबुच्या काठ्यांनी मारहाण करुन पत्नीचा खून केल्याचे तपासात समोर आल्याने पोलीस अंमलदार सुनिल सुसर यांच्या फिर्यादीवरुन उपरोक्त गुन्ह्यात खुनाचे कलम समाविष्ट करण्यात आले. विशेष म्हणजे आरोपीपीने पत्नीस मारहाण केल्याची घटना खंडेलवाल, गौतम तायडे, अनिल तायडे व अजय शेवरे यांनी प्रत्यक्ष बघितली होती. पोलिसांनी त्यांचे जबाब नोंदवून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. न्यायालयाने प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे एकुण ८ साक्षीदार तपासले. सदर प्रकरणात घटनास्थळ पंचनामा, मृतकाचा पंचनामा, शवविच्छेद अहवाल तसेच हत्यारजप्ती पंचनामा व इतर सर्व कागदपत्रे पुराव्याअंती विद्यमान न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सदर प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे न्यायालयाने नोंदविलेले बयाण महत्ववूर्ण ठरले. तसेच घटनास्थळावरील साक्षीदार, जप्ती पंचनाम्यावरील साक्षीदार व डॉ.शरद पाटील, फिर्यादी पोलीस अंमलदार सुनिल सुसर, तपास अधिकारी प्रकाश सोमनाथ पवार यांची साक्ष नोंदविण्यात आली. सदर प्रकरणामध्ये साक्षपुराव्याच्या आधारे खामगाव येथील विद्यमान जिल्हा न्यायाधीश क-१ जी.बी.जाधव यांनी ९ जानेवारी रोजी न्यायनिर्णय पारीत केला. त्यानुसार आरोपीने पत्नी मिराबाई हिचा निर्घृण खून केल्याचे सिध्द झाल्याने भादंविचे कलम ३०२ प्रमाणे आजन्म कारावास व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्षाचा सश्रम कारावास, अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *