क्राईम जगत

संतापजनक : बुलढाण्याच्या बोदेगावमधील कुटुंबावर सामाजिक बहिष्कार

धाड, (प्रतिनिधी) : मानव चंद्रावर जाऊन पोहोचला तरी, जात अजूनही जात नसल्याचे दिसून येत आहे. शिक्षण, औद्योगिकीकरण आणि शहरीकरण होऊन देखील समाजात खोलवर रुजलेली निघायचं नाव घेत नसल्याचा प्रकार नुकताच समोर धाड पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बोदेगाव (ता.बुलढाणा) मध्ये समोर आला. येथील एका कुटुंबाला धार्मिक कार्यक्रमातून वाळीत टाकून त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला. याप्रकरणी बुलढाणा न्यायालयाच्या आदेशावरून धाड पोलिसांनी सात जणांविरुद्ध महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

बोदेगाव (ता.बुलढाणा) येथील रहिवासी असलेले भाऊसाहेब पंडितराव दांडगे (वय ५६ वर्षे) यांना व त्यांच्या कुटुंबाला गावातील किराणा सामान मिळण्यावर बंदी घातली. तसेच कोणत्याही सार्वजनिक सेवा वापरण्यापासून त्यांना रोखण्यात आले असून आपल्या शेतात कोणत्याही मजुराने काम करू नये, असा फतवा देखील काढला. एवढ्यावरच न थांबता आपल्याला व आपल्या कुटुंबियांना धार्मिक आणि वैयक्तिक कार्यक्रमांत वाळीत टाकण्याच्या अटी लादून त्यांच्या नावाने गावात बदनामीकारक फलक लावल्याचा अर्ज भाऊसाहेब दांडगे यांनी बुलढाणा न्यायालयात दाखल केला होता.

दरम्यान, बुलढाणा न्यायालयाने उपरोक्त प्रकरणाची गंभीर दखल घेत, आरोप राजेंद्र बाबुराव उबाळे ( वय ४२ वर्षे), अमोल माणिकराव उबाळे (वय ३५ वर्षे), कैलास शेनफड उबाळे (वय ३८ वर्षे), रामेश्वर देविदास उबाळे (वय ३४ वर्षे), शीतल नरेंद्र उबाळे (वय ४२ वर्षे), किरण रावसाहेब लहाने ( वय ३७ वर्षे) आणि रावसाहेब नायबराव लहाने (वय ६८ वर्षे) सर्व रा.बोदेगाव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश धाड पोलिसांना दिले होते. सदर आदेशान्वये धाड पोलिसांनी उपरोक्त सात जणांविरुद्ध महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक अधिनियम २०१६ चे कलम ३, ४, ५, ६, ७ तसेच भारतीय न्याय संहिताचे कलम १९०, ६१ (१), ६१ (२), ३५६ (१), ३५६ (२) आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे हे करत आहेत. या घटनेमुळे मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून सामाजिक बहिष्कार टाकणाऱ्या प्रवृत्तींविरुद्ध कठोर कडवी करण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *