“हायवे”च्या हॉटेल्सवर वन्यप्राण्यांचे मांस!
डोणगाव,(प्रतिनिधी): महामार्गावरील धाब्यांवर एक ना अनेक अवैध प्रकार चालतात, हे काही नवीन नाही. मात्र, डोणगावच्या एका हॉटेलचालकाने तर अवैध प्रकाराच्या सर्वच सीमा ओलांडल्याची बाब समोर आली आहे. या हॉटेलवर चक्क वन्यप्राण्यांचे मांस शिजवले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला असून बुलढाणा वनविभागाच्या पथकाने टाकलेल्या धाडीतून हे निष्पन्न झाले आहे. या छाप्यात वन्य विभागाच्या पथकाने हॉटेलमधून वन्यप्राण्यांचे दीड ते दोन किलो मांस जप्त केले असून सदर मांस प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.
महामार्गावरील हॉटेल्स आणि अवैध प्रकार आपल्याकडे काही नवीन नाही. मात्र, जिल्ह्यातील डोणगाव (ता. मेहकर) परिसरातून जाणाऱ्या राज्य महामार्गावर असलेल्या अनेक धाब्यांवर देशी दारूची अवैध, तसेच वन्यप्राण्यांच्या मांसाची मेजवानी दिली जात असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे बुलढाणा वनविभागाच्या उपवनसंरक्षक सरोज गवस, सहाय्यक वनसंरक्षक वैभव काकडे आणि घाटबोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अंकुश येवले यांच्या मार्गदर्शनात वनविभागाच्या पथकाने १३ जानेवारी रोजी रात्री ८:१० वाजेच्या सुमारास हॉटेलवर अचानक धाड टाकली. त्यावेळी हॉटेलमध्ये प्राण्यांचे मांस शिजताना तसेच काही लोक शिजलेल्या मांसावर ताव मारतांना आढळून आले. पथकाला छाप्यादरम्यान हॉटेलमध्ये मिळून आलेले सुमारे दीड ते दोन किलो वन्यप्राण्यांचे मांस जप्त केले असून सदर मासांचे नमुने सील करून ते कोणत्या प्राण्याचे आहे, या तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. उपरोक्त प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ते मांस कोणत्या प्राण्याचे आहे, हे स्पष्ट होणार असून त्यानंतरच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी अंकुश येवले यांनी दिली आहे.
प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
डोणगाव परिसरातील महामार्गावर असलेले हॉटेल आणि धाबे रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. या हॉटेल्समध्ये अवैध दारूच मिळत नाही, तर आता वन्यप्राण्यांचे मांसही उपलब्ध होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे. या प्रकारांमुळे स्थानिक पोलीस प्रशासनाने लक्ष केंद्रित करून रात्रीची गस्त वाढवत अवैध धंद्यांवर कारवाई करावी,अशी मागणी होत आहे.

