महाराष्ट्र माझा

मलकापूरच्या रुचिताची आकाशाला गवसणी

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी) : विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या मलकापूरनगरीची मान उंचावणारी कामगिरी करत येथील रुचिता उमेश डाके हिने देशातील नामांकित विमानसेवा कंपनी एअर इंडियामध्ये केबिन क्रू म्हणून एंट्री केली. दिल्ली येथे पार पडलेल्या या निवड प्रक्रियेत तिने यश संपादन केक असून तिच्या यशामुळे मलकापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

मलकापूर (जि.बुलढाणा) येथील रहिवासी असलेल्या रुचिता डाके हिची बुलढाणा जिल्ह्यातून एअर इंडियामध्ये निवड झालेल्या मोजक्या उमेदवारांपैकी एकमध्ये समावेश आहे. रुचिताचे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षण मलकापूर येथे झाले असून सध्या ती मुंबई येथे एलएलबी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे. शिक्षणासोबतच विमानसेवेतील करिअर घडवण्याचे स्वप्न तिने उरी बाळगले होते. नव्हेतर आपली मेहनत,जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सदर स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. विमानात प्रवाशांच्या सुरक्षिततेची आणि आरामाची काळजी घेण्यासाठी तिची ही निवड करण्यात आली आहे.
रुचिताच्या या यशाबद्दल मलकापूर शहरासह संपूर्ण तालुक्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून कुटुंबीय, मित्रपरिवार व नागरिकांकडून तिचे कौतुक केले जात आहे. तिचे हे यश ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना, विशेषतः मुलींना नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *