क्राईम जगत

चांडोळमधून ३६ हजारांचा मका लंपास

नदीम शेख
चांडोळ, (प्रतिनिधी): जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. आजवर सुटलेल्या धाड पोलीस स्टेशन हद्दीतही आता शेतीमालाच्या चोऱ्यांच्या घटना समोर येत आहे. चांडोळ येथील शेतकऱ्याने आपल्या शेत शिवारात साठवून ठेवलेल्या मक्याच्या तब्बल ४८ पोत्यांवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. याप्रकरणी धाड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चांडोळ (ता.बुलढाणा) येथील रहिवासी असलेले सतपाल गोविंदसिंग बारवाल (वय ३८ वर्षे) यांची चांडोळ शिवारात गट क्रमांक २७५ मध्ये शेती आहे. बारवाल यांनी शेतात पेरलेल्या मका पिकाची कापणी करून सदर मका पोत्यांमध्ये भरून शेतातच ठेवला होता. दरम्यान, १६ जानेवारीच्या सायंकाळी ७.३० ते १७ जानेवारीच्या सकाळी ८ वाजेच्या दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी संधी साधून त्यांच्या शेतात प्रवेश करून शेतातून मक्याची ४८ पोती (अंदाजे किंमत ३६ हजार रुपये) चोरून नेली. बारवाल शेतात गेल्यानंतर त्यांच्या ही घाटना लक्षात आली.
याप्रकरणी बारवाल यांनी धाड पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार रविंद्र चव्हाण हे करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नव्हेतर रात्रीच्या वेळी शेतीमालाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *