लाडकी बहीण योजनेवर संकट!
अकोला,(प्रतिनिधी): राज्यभर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचे हप्ते अद्याप न मिळाल्याने मोठ्या संख्येने लाभार्थी महिला अडचणीत सापडल्या आहेत. ई-केवायसी प्रक्रियेनंतर करण्यात आलेल्या मोठ्या बदलांमुळे अनेक महिला पात्र असूनही अपात्र ठरवण्यात आल्या आहेत. परिणामी गेल्या दोन आठवड्यांपासून त्या योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या आहेत. या समस्येसंदर्भात अनेक महिला अकोला येथील महिला व बाल विकास कार्यालयात फेऱ्या मारत आहेत. कार्यालयात त्यांना ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान झालेल्या तांत्रिक चुका अथवा माहितीतील त्रुटींमुळे त्यांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे संतप्त व चिंताग्रस्त झालेल्या महिला पुढे आपले काय होणार आणि योजनेचा लाभ पुन्हा कसा मिळणार, असा सवाल उपस्थित करत आहेत. मात्र, या संदर्भात अद्याप कोणतेही स्पष्ट, ठोस अथवा अधिकृत मार्गदर्शन समोर आलेले नाही.
ई-केवायसीतील तांत्रिक बिघाडामुळे अपात्र ठरलेल्या महिलांनी राज्य शासन व संबंधित विभागाकडे या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. महिलांचे म्हणणे आहे की, तांत्रिक बिघाड किंवा चुकीच्या माहितीतून जर त्या अपात्र ठरल्या असतील, तर शासनाने याची दखल घेऊन ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू करावी, जेणेकरून मागील वेळी झालेल्या त्रुटींमुळे वंचित राहिलेल्या महिला पुन्हा पात्र ठरून योजनेचा लाभ घेऊ शकतील. अकोला येथील महिला व बाल विकास कार्यालयात सध्या मोठ्या संख्येने महिला आपल्या ई-केवायसीचा स्टेटस तपासण्यासाठी येत आहेत. तपासणीनंतर त्यांना ई-केवायसी दरम्यान झालेल्या चुका आणि तांत्रिक समस्यांची माहिती दिली जात आहे. या संदर्भात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी सांगितले की, ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या त्रुटींमुळे बहुतांश महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या आहेत. शासनाकडून कोणताही अधिकृत आदेश येईपयंर्त यावर काही बोलणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, ज्या महिलांना तक्रार आहे, त्यांनी कार्यालयात लेखी तक्रार अर्ज द्यावा, तो वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
अकोला जिल्ह्यातील सर्व तालुक्यांप्रमाणेच पातूर येथूनही अनेक महिला अकोला येथील महिला व बाल विकास कार्यालयात दाखल झाल्या. त्यांनी अपात्र ठरण्याबाबत तसेच ई-केवायसीमधील गोंधळाबाबत माहिती घेतली. यावेळी काही महिलांनी असा आरोपही केला की, ई-केवायसी प्रक्रियेत दिशाभूल करणाऱ्या पद्धतीने पर्याय देण्यात आले, त्यामुळे त्यांच्याकडून चुका झाल्या आणि त्या योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या. त्यामुळे ई-केवायसी प्रक्रिया पूर्णपणे नव्याने राबवून त्यांना लाभ देण्यात यावा, अशी मागणी महिलांनी केली.
पात्र असूनही लाभार्थी अपात्र
लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेचा उद्देश अयोग्य व चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींना अपात्र ठरवणे हा होता. मात्र, ई-केवायसीनंतर पात्र महिलाच या योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्याचे चित्र समोर आले आहे. तसेच संबंधित विभागाकडून जनजागृती न केल्याने आणि योग्य माहिती न दिल्याने अनेक महिला अपात्र ठरल्याचा आरोपही करण्यात येत आहे. अशा प्रकारचे विविध आरोप महिलांकडून करण्यात येत आहेत.

