स्मार्ट बुलढाणा

दुर्दैवी: बुलढाण्याच्या वरवंड फाट्यावर तरुणाचा पुन्हा अपघाती मृत्यू

बुलढाणा, (प्रतिनिधी) : मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातांच्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन तरुणांचा जीव गेला. तर दोन गंभीर झाले. १८ जानेवारीच्या रात्री वरवंड फाट्याजवळ हॉटेल गारवा जवळ झालेल्या भीषण अपघातात एका २३ वर्षीय तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अन्य दोन दुर्घटनांमध्ये दोन व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या घटनांमुळे शहरातील मिलिंदनगरसह मलकापूर व मोताळ्यात हळहळ व्यक्त होत आहे.
बुलढाणा शहरालगत असलेल्या वरवंड फाटा परिसरातील हॉटेल गारवा जवळ १८ जानेवारीच्या रात्री खामगावकडून बुलढाण्याकडे येणाऱ्या भरधाव अर्टिगा कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत मिलिंद नगर (बुलढाणा) येथील रहिवासी असलेला दुचाकीस्वार विशाल खंडारे (वय २३ वर्षे) या तरुणाच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.तर त्याच्यासोबत असलेला वसंता घेवंदे नावाचा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर वरवंड परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होऊन संतप्त नागरिकांनी वरवंड फाटा अपघातप्रवण क्षेत्र असून प्रशासन याठिकाणी उपाययोजना का करत नाही?, असा प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान, पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेले अर्टिगा वाहन ताब्यात घेतले असून चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
मलकापूर आणि मोटाळ्यातही अपघात
काल रात्री दुसरी दुर्दैवी घटना मलकापूर येथील राष्ट्रीय महामार्गावर घडली. रस्ता ओलांडत असताना एका अज्ञात वाहनाने पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. या धडकेतही इसमाचा घटनास्थळी मृत्यू झाला. अपघातानंतर चालक वाहन घेऊन फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. तर नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटून त्याखाली दबून एका युवकाचा करुण अंत झाला. तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे. १८ जानेवारीच्या सायंकाळी बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा, मोताळा आणि मलकापूर तालुक्यात सलग घडलेल्या या तीन घटनांमुळे सर्वत्र भीतीचे आणि दुःखाचे वातावरण पसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *