तेल्हारा शिवारात बिबट्याचा हैदोस!
तालुक्यातील मुंगसरी येथील रहिवासी विलास गाडेकर या शेतकऱ्याचे शेत तेल्हारा शिवारात आहे. १८ जानेवारीच्या रात्री शेतात आलेल्या बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला. हे श्वान तगडे होते. स्वत:चा बचाव करण्यासाठी बिबट्याशी झुंज देण्याचा प्रयत्न केला, मात्र बिबट्याच्या ताकदीपुढे त्याचा निभाव लागला नाही. बिबट्याने नरडीचा घोट घेऊन ठार करीत त्याला दूरवर फरफटत नेले. रात्री शेतात गेलेल्या शेतकऱ्याच्या निदर्शनास ही घटना आली.
सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्याचे काम सुरू असल्याने शेतकऱ्यांना रात्री शेतात राहावे लागते. अशा परिस्थितीत बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
दिवसेंदिवस बिबट्याकडून होणाऱ्या शिकारीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाही वनविभाग याकडे गांभीर्याने पाहात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वनविभागाचे अधिकारी केवळ कुत्र्यावरील हल्ला समजून या घटनेकडे दुर्लक्ष करीत आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन वनविभागाने तातडीने या परिसरात पिंजरा लावावा आणि बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी जोर धरत आहे.
मनुष्याचा बळी गेल्यास जबाबदार कोण?
आज बिबट्याने कुत्रे व वासरांना लक्ष्य केले आहे, उद्या जर एखाद्या मानवी जिवाचे बरे-वाईट झाले तर याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल शेतकरी करीत आहेत. वन्यप्राण्यांच्या या वाढत्या दहशतीमुळे शेतमजुरांनी शेतात कामाला येण्यास नकार दिला असून, पिकांच्या सिंचनाचा प्रश्नही गंभीर बनला आहे.

