क्राईम जगत

खामगावात चोरट्यांचा धुमाकूळ: दोन कंपन्यांमध्ये ११.७५ लाखांची धाडसी चोरी

खामगाव (प्रतिनिधी): खामगाव शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या दोन प्रतिष्ठित कंपन्यांच्या कार्यालयावर चोरट्यांनी मध्यरात्री डल्ला मारला. “शिवांगी बेकर्स” आणि “ओम ॲग्रो मिल” या दोन ठिकाणी झालेल्या या धाडसी चोरीत तब्बल ११ लाख ७५ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. या घटनेतून गुन्हेगारांच्या वाढलेल्या मनोबलाचा प्रत्यय आला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
खामगाव शहरातील तलाव रोड परिसरात येणाऱ्या जनुना शिवारात शिवांगी बेकर्स प्रायव्हेट लिमिटेड  आणि ओम ॲग्रो मिल प्रायव्हेट लिमिटेड ही कार्यालये आहेत. २२ जानेवारी २०२६ च्या पहाटे २ वाजेच्या सुमारास चार अज्ञात चोरट्यांनी या परिसरात प्रवेश केला. पूर्ण तयारीनिशी आलेल्या या चोरट्यांनी सुरुवातील शिवांगी बेकर्सच्या कार्यालयाचे कडी-कोंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. कार्यालयातील ड्रॉवरचे लॉक तोडून त्यातून २ लाख रुपयांची रोकड लंपास केली. या घटनेला अंजाम दिल्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा शेजारीच असलेल्या गोपाल पुरुषोत्तम गोयल यांच्या मालकीच्या ओम ॲग्रो मिल प्रायव्हेट लिमिटेड, या कंपनीच्या कार्यालयाकडे वळवला. तिथेही चोरट्यांनी त्याच पद्धतीने कुलूप तोडून आत प्रवेश करत कार्यालयातील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून त्यात असलेली ९ लाख ७५ हजार रुपये, असे एकूण ११ लाख ७५ हजार रुपयांची रोकड लंपास केली.
सकाळी जेव्हा ही घटना उघडकीस आल्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापनाने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही कंपन्यांमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यामध्ये चार संशयित व्यक्ती मास्क घालून वावरताना आढळून आले. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. औद्योगिक आणि व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या या परिसरात मोठी चोरी झाल्याने स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. चोरट्यांनी ज्या पद्धतीने कुलूपे तोडली आणि अचूकपणे रोकड शोधली, त्यावरून यामागे एखाद्या सराईत टोळीचा हात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
याप्रकरणी शिवांगी बेकर्सचे संचालक अभय कुमार सुरेशचंद्र अग्रवाल (वय ४७ वर्षे) रा.संत ज्ञानी सदन, खामगाव यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ३३१ (४), ३०५ (अ), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मंदार पुरी व त्यांचे सहकारी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *