बालाजीनगरीत मंगळवारी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज पादूका दर्शन सोहळा
देऊळगाव राजा,(प्रतिनिधी): अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज (नाणीजधाम) यांच्या पादूका दर्शन सोहळ्याचे आयोजन २७ जानेवारी रोजी देऊळगाव राजा येथील जालना रोडवर असलेल्या धोंडीराज मठात करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता सुरू होणाऱ्या या सोहळ्यात भाविकांना पादूका दर्शन, उपासक दीक्षा आणि गुरुपूजनाचा लाभ घेता येणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान केवळ आध्यात्मिक क्षेत्रातच नव्हे, तर सामाजिक क्षेत्रातही अग्रेसर आहे. संस्थानच्या वतीने अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामस्वच्छता आणि मोफत शिक्षण (इंग्रजी माध्यम व वेदपाठ शाळा) असे उपक्रम राबवले जातात. विशेष म्हणजे, जानेवारी २०२६ मध्ये अवघ्या १५ दिवसांत १ लाख ७१ हजार १५० रक्त पिशव्यांचे संकलन करून संस्थानने एक मोठा टप्पा गाठला आहे. तसेच “एक पेड माँ के नाम” मोहिमेतंर्गत नोव्हेंबर २०२५ मध्ये १ लाख १० हजार ६८७ वृक्षारोपण करण्यात आले आहे. संस्थानच्या ५३ रुग्णवाहिका महाराष्ट्रातील विविध महामार्गांवर २४ तास अपघातग्रस्तांच्या सेवेत तैनात आहेत.
मंगळवार,२७ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्याच्या मंगल प्रसंगी इच्छुकांना उपासक दीक्षा दिली जाणार आहे. सोहळ्याला येणाऱ्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची देखील उत्तम व्यवस्था करण्यात आल्याची माहिती पश्चिम विदर्भ पीठ प्रमुख कुंडलिकराव वायभासे, व्यवस्थापक सुरेश मोरे, ऋषिकेश बिरारी आणि प्रसिद्धी प्रमुख अमर इधोळ यांनी दिली असून सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी दक्षिण बुलडाणा जिल्हा सेवाध्यक्ष गणेश खडोळ, जिल्हा महिलाध्यक्ष आशाताई निंभोरे, इंजिनिअर दीपक चिंचोले, लताताई चिंचोले, जिल्हा कर्नल संजय हराळ, सचिव प्रवीण कऱ्हाळे, युवाध्यक्ष मंगेश मोठे यांसह संपूर्ण तालुका व जिल्हा सेवा समिती परिश्रम घेत आहे. देऊळगाव राजा परिसरातील सर्व भाविक, साधक आणि हितचिंतकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन स्थानिक सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

