स्मार्ट बुलढाणा

चेंदामेंदा!स्विफ्ट डिझायरच्या जबर धडकेत महिला ठार

लोणार,(प्रतिनिधी):तालुक्यातील किनगावजटू येथून मातमळकडे नेटसेटच्या कामासाठी जाणाऱ्या महिला मजुरांच्या ऑटोला भरधाव वेगातील स्विफ्ट डिझायर कारने धडक दिली. या भीषण अपघातात एक मजूर महिला ठार तर अन्य आठ महिला गंभीर जखमी झाल्या. ही दुर्घटना आज १ फेब्रुवारीच्या सकाळी ८ वाजता दरम्यान सरस्वती नदीजवळ बाजड यांच्या शेताजवळील वळणावर घडली.

ऑटो रिक्षा क्रमांक एमएच-२८-आर-२२११ चा चालक त्याच्या ऑटोमध्ये महिला मजूर घेऊन किनगावजटू येथून मातमळकडे जात होता. या रस्त्यावर असलेल्या सरस्वती नदीजवळ बाजड यांच्या शेताजवळील वळणावर सरस्वतीकडून भरधाव वेगाने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एच-४३-एएफ-५८२१ ने या ऑटोला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे ऑटो पलटी होऊन त्यातील महिलामजूर रस्त्याच्या बाजूला फेकल्या गेल्या. नव्हेतर या दुर्घटनेत जरीनाबी अय्युबशहा (वय ४५ वर्षे) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर रंजना परमेश्वर कास्तोडे (वय ५३ वर्ष), शांताबाई शेवाळे (वय ४५ वर्षे), कल्पना विठ्ठल जमधाडे (वय ४० वर्षे), अलका मधुकर शेवाळे (वय ४० वर्षे), लक्ष्मण बबन करवते (वय ४५ वर्षे), चंद्रभागा गजानन नागरे (वय ४० वर्षे), राधा गजानन गायकवाड यांच्यासह ऑटोचालक आसिफ निंशालशहा वय (३० वर्षे) हे आठ जण गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर स्विफ्ट डिझायरचा चालक घटनास्थळावरून फरार झाला असून संबंधित कार ही हिवराखंड येथील असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिकेने जखमींना लोणार येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारात दाखल केले. सदर ठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर काही जखमींना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून लोणार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास लोणार पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *