क्राईम जगत

खामगावात महिलेला घातली रक्ताची अंघोळ!

अजय टप 

मलकापूर, (प्रतिनिधी): मागील ४८ तासांत जिल्ह्याच्या विविध भागात गंभीर गुन्ह्यांच्या घटना घडल्या. किरकोळ वादातून कुठे रक्ताचा सडा पडला, तर लोखंडी पाईप आणि फावड्याच्या दांड्यांनी मारामाऱ्या झाल्या. खामगाव, मलकापूर आणि बुलढाणा शहर परिसरात घडलेल्या किंबहुना झालेल्या प्राणघातक हल्ल्यांमुळे जिल्ह्यात गुन्हेगारांची हिंमत चांगलीच बोकाळल्याची दिसून येत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. घडणाऱ्या या घटनांना वेळीच आवर घातला गेला नाही, तर या घटना जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेला मारक ठरणार आहेत.

खामगावमध्ये तक्रार दिली म्हणून डोके फोडले!खामगाव तालुक्यातील हिंगणा कारेगाव येथील एका ५६ वर्षीय महिलेला केवळ पोलिसांत तक्रार केल्याच्या रागातून आरोपींनी चक्क रक्ताची अंघोळ घातली. “आमच्या विरोधात पोलिसांत तक्रार का केली?” असा जाब विचारत नराधमांनी अंजना जाधव नामक वृद्ध महिलेच्या डोक्यात दगड मारून त्यांना गंभीर जखमी केले. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास सुरू आहे.

मलकापूरमध्ये गॅंगवार 

म्हैसवाडी (ता. मलकापूर) येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या या गावात विजय खवले यांच्या कुटुंबावर लोखंडी पाईप आणि काठीने हल्ला चढवत त्यांना जीवाने ठार मारण्याची धमकी देण्यात आली. तर दुसऱ्या बाजूच्या अक्षय सुरडकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना आरोपींनी लोखंडी पाईप आणि फावड्यांनी मारहाण केली. तसेच महिलांच्या अंगावरील दागिने तोडण्यापर्यंत आरोपींची मजल गेली. या प्रकरणी पोलिसांनी परस्परविरुद्ध तक्रारीवरून गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे.

बुलढाण्यात नंगानाच

बुलढाणा शहरातील चिखली रोडवर असलेल्या सूर्या वाईन बारसमोर शहरवासीयांना दिवसाढवळ्या गुंडगिरीचा नंगानाच अनुभवास मिळाला. सरकारी जागेत भाजीचे दुकान लावण्याच्या कारणावरून सुरू झालेल्या या वादातून आरोपींनी बबन झिरे यांच्या डोक्यात दगड घालून त्यांचे डोके फोडले. एवढेच नाही तर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बापाला वाचवण्यासाठी गेलेल्या मुलालाही आरोपींनी मारहाण केल्याची तक्रार बुलढाणा शहर पोलिसांत दाखल झालेली आहे. भररस्त्यात झालेल्या या प्रकारावरुण गुन्हेगारी प्रवृत्तीला कायद्याचा धाकच उरला नसल्याचे दिसून येत आहे.

या सर्व घटनांमध्ये लोखंडी पाईप, दगड आणि लाठ्याकाठ्यांचा सळसळाट करणाऱ्या या आरोपींवर कठोर कारवाईची मागणी कायदप्रिय नागरिकांमधून होत आहे. नव्हेतर जिल्ह्यातील ही गुंडशाही थांबवण्यासाठी पोलिसांनी कडक “अँक्शन प्लान” अंमलात आणण्याची गरज आहे, एवढे मात्र खरे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *