क्राईम जगत

बुलढाण्यात भरदिवसा १ लाख ९१ हजारांची घरफोडी

बुलढाणा,(प्रतिनिधी): शहरातील मलकापूर रोड परिसरातील चोपडा शोरूमच्या पाठीमागे असलेल्या एका घरात भरदिवसा घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून कपाटातील रोख रक्कम आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एकूण १ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मलकापूर रोड परिसरात राहणारे सचिन शंकर शिल्लारकर (वय ३५ वर्षे) यांची चहाची हॉटेल आहे. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता ते नेहमीप्रमाणे हॉटेलवर कामाला गेले आणि घरी त्यांचे आई-वडील, पत्नी हेच होते. सकाळी ११ च्या सुमारास त्यांची आई आणि पत्नी नातेवाईकांकडे एका कार्यक्रमासाठी घरातून बाहेर गेल्या. दुपारी २.३० वाजता वडीलही घराला कुलूप लावून बाहेर निघून गेले. दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी घरी परतली असता, त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश केला असता, लोखंडी कपाटाचे लॉकर तोडलेले होते आणि सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यांनी तपासणी केली असता, चोरट्याने कपाटात ठेवलेली १ लाख ४० हजार रुपयांची रोकड, ५१ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे जुने दागिने, असा एकूण १ लाख ९१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

याप्रकरणी सचिन शिल्लारकर यांनी बुलढाणा शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१ (३), ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवी मोरे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *