हुंड्याच्या छळामुळे विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी): गेल्या पंधरा वर्षांपासून सासरच्या मंडळींकडून होणारा शारीरिक व मानसिक त्रास, माहेरून पैसे आणि शेतीतील हिस्सा आणण्यासाठी लावलेला तगादा असाह्य झाल्याने एका ३५ वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना वडाळी (ता.नांदुरा) येथे उघडकीस आली. याप्रकरणी नांदुरा पोलिसांत पतीसह पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या पंधरा वर्षांपूर्वी मयत वर्षा जयंत वक्टे (वय ३५ वर्षे) यांचा विवाह जयंत वक्टे याच्या सोबत झाला होता. लग्नाच्या काहीदिवस वर्षाला चांगली वागणूक दिल्यानंतर पती जयंत वक्टे याने तिला दारू पिऊन मारहाण करणे सुरू केले. “माहेरून पैसे घेऊन ये आणि तुझ्या वाट्याची शेती आमच्या नावावर कर,” असा तगादा देखील त्याने वर्षाकडे लावला होता. सोबतच सासरच्या इतर मंडळींनी देखील तिचा छळ चालवला होता. सततचा होणारा हा त्रास असाह्य होत असल्याने वर्षा प्रचंड तणावात होती.
दरम्यान, ३ फेब्रुवारीच्या रात्री सासरच्या जाचाला कंटाळून तिने शेतातील विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. वर्षाच्या आत्महत्येची माहिती मिळताच तिचा भाऊ संदिप सोपान फरपट (रा. अंबरनाथ, जि. ठाणे) यांनी नांदुरा पोलिसांत धाव घेऊन सासरच्या मंडळींविरुद्ध फिर्याद दिली असून पोलिसांनी पती जयंत वामन वक्टे, सासू शांताबाई वामन वक्टे, सासरे वामन वक्टे, जेठ अनंता वामन वक्टे आणि दूर अमोल वामन वक्टे याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम १०८, ८५ आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनात महिला पोलीस उपनिरीक्षक आवारे ह्या करीत आहेत.

