महाराष्ट्र माझा

दिनविशेष: ‘ए मेरे वतनके लोगों’…कवी प्रदीप यांची जयंती

कवी प्रदीप : (६ फेब्रुवारी १९१५–११ डिसेंबर १९९८). हिंदी चित्रपटसृष्टीतील आणि हिंदी साहित्यातील सुप्रसिद्ध गीतकार आणि कवी. रामचंद्र नारायण द्विवेदी हे त्यांचे मूळ नाव पण त्यांनी ‘प्रदीप’ या नावाने कवितालेखन करायला सुरुवात केली. कवी प्रदीप यांनी अनेक प्रकारची गाणी लिहिली. पण प्रामुख्याने ते त्यांनी लिहिलेल्या देशभक्तीपर गीतांमुळे जास्त प्रसिद्ध झाले. भारत चीन युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना श्रध्दांजली म्हणून ‘ए मेरे वतनके लोगों,जरा आँख में भरलो पानी,जो शहीद हुये हैं उनकी,जरा याद करो कुर्बानी ‘…..हे अतिशय भावनिक गीत लिहिले व २६ जानेवारी १९६३ मध्ये राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन व पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर लता मंगेशकर यांनी हे गीत सादर केले. प्रदीप यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. १९६१ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देण्यात आला. कवी प्रदीप यांना ‘राष्ट्रीय कवी’ म्हणून सन्मानित करण्यात आले (१९९५). भारत सरकारने त्यांना चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाकरिता दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविले (१९९८). हिंदी चित्रपटसृष्टीतील पाच दशकांच्या कारकीर्दीत त्यांनी सुमारे ५४० गीते लिहिली आणि काही चित्रपटांत गाणी गायली. आज त्यांच्या ११० व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *