क्राईम जगत

मलकापूरात खळबळ! दिवसाढवळ्या पावणे दोन लाखांची रोकड लंपास

अजय टप
मलकापूर (प्रतिनिधी): शहरातील नांदुरा रोडवर असलेल्या मातोश्री हॉलसमोर एका दुचाकीस्वाराची डिक्की फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल १ लाख ७० हजार रुपयांची रोकड लंपास केली. आज ६ फेब्रुवारीच्या दुपारी ही घटना घडली. या घटनेमुळे शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली. दिवसाढवळ्या आणि तेही भररस्त्यात झालेल्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हरणखेड (ता.मलकापूर) येथील रहिवासी असलेले ज्ञानदेव पुंडलिक चिमकर (वय ४८ वर्षे) हे व्यावसायिक आहेत. आज ६ फेब्रुवारी रोजी दुपारी त्यांनी स्थानिक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून १ लाख ७० हजार रुपये रोख काढले होते. ही रक्कम त्यांनी एका कापडी पिशवीत गुंडाळून आपल्या फॅशन प्रो मोटारसायकल क्रमांक एमएच-१९-बीएच०४२८ च्या डिक्कीमध्ये सुरक्षित ठेऊन डिक्की लॉक केली. त्यानंतर चिमकर आपल्या दुचाकीने खामगावकडे जाण्यासाठी निघाले. दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील नांदुरा रोडवर असलेल्या मातोश्री हॉलसमोर त्यांनी आपली गाडी सर्व्हिस रोडच्या कडेला उभी केली. नैसर्गिक विधीसाठी ते जवळच असलेल्या झाडाच्या आडोशाला गेले आणि अवघ्या काही मिनिटात लघुशंका आटोपून ते आपल्या दुचाकीजवळ परतले. तेव्हा त्यांना गाडीच्या डिक्कीचे लॉक तुटलेले आणि डिक्कीतून १ लाख ७० हजार रुपयांची रोकड असलेली पिशवी गायब असल्याचे दिसले.
या प्रकरणी ज्ञानदेव चिमकर यांनी मलकापूर शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार रामचंद्र भोपळे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *