महाराष्ट्र माझा

काळाचा घाला! बुलढाण्याच्या दोन सुपुत्रांचा अपघाती मृत्यू

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पुलाखाली कोसळला आणि ट्रकमधील लोखंडी पाईप थेट केबिनमध्ये घुसले. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेत बुलढाणा शहरातील इक्बाल चौक परिसरातील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. नागपूरहून संभाजीनगरकडे लोखंडी पाईप घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रकला मूर्तिजापूरजवळील कुरुम येथे हा भीषण अपघात झाला.
नागपूरहून लोखंडी पाईप घेऊन आयशर ट्रक छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात होता. रात्री ११.३० ते ११.४५ च्या सुमारास कुरुम गावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी पुलावरून खाली कोसळली. त्यामुळे मागच्या बाजूला असलेले जड लोखंडी पाईप केबिनचा पत्रा फाडून आत शिरले. आणि उपरोक्त दोघांच्या अंगात घुसले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. या भीषण अपघातात बुलढाणा शहरातील इक्बाल चौक परिसरात राहणारा चालक काझी अनिसोदिन आणि शेख रिहान या दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला. या हृदयदायक घटनेमुळे बुलढाणा शहरात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली.अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह गाडीच्या बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *