संग्रामपूर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलनाने जुन्या आठवणींना उजाळा
संग्रामपूर,(प्रतिनिधी): शहरातील पीएम श्री जि.प.हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन मेळावा नुकताच उत्साहात पार पडला.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जि.प. हायस्कूलचे से.नि.प्र. मुख्याध्यापक श्रीरंग ढोकणे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून याच हायस्कूलची विद्यार्थिनी, शिक्षिका तथा से.नि प्रभारी मुख्याध्यापिका चित्राताई राजनकर होत्या. प्रथम राष्ट्रगीत होऊन सरस्वती माता व संत शिरोमणी रविदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व शिक्षकांचे स्वागत करून यथोचित सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थी तथा पत्रकार अनिलसिंग चव्हाण यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी अतुल राऊत, सतीश घाटे, श्याम उमरकर, हरीश मारोठे, विशाल वानखडे, प्रदीप बोदडे उपस्थित होते. देवलाल भड यांनी प्रास्ताविकातून २००५ ते २००६ मध्ये दहाव्या वर्गात असतांना शाळेतील जुने अनुभव व आताचे अनुभव व्यक्त केले. तसेच इतर विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सुद्धा आपापले अनुभव सांगून शालेय जीवन कसे एका चौकटीत व शिस्तबद्ध होते. सर्व शिक्षकांनी चांगले आचार, विचार व शिक्षण दिले. म्हणून आज आम्ही चांगले नागरिक म्हणून समजत वावरत असल्याचे सांगितले. २० वर्षानंतर भरलेल्या जुन्या मित्रांच्या या शाळेमुळे जुन्या गोड आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्याचेही त्यांनी बोलतांना नमूद केले. यावेळी माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला स्पीकर भेट देण्यात आला. या प्रसंगी शिक्षक मोरणकर, राठोड, इंगळे, मारोडे, मेहरकर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी वृंद उपस्थित होते. यावेळी शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात देत समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन माजी विद्यार्थी प्रवीण वानखडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन विजय आकोटकर, अंजली अजने, अश्विनी इंगळे यांनी मानले.


स्थानिक बातम्यांच्या भरगच्च कवरेजमुळे अल्पावधीतच यशोशीखर गाठणारे हिंदवार्ता निश्चितच बुलडाणा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे आहे.