क्राईम जगत

नांदुरा आणि मलकापूरला पुन्हा धक्का! पुन्हा दोन तरुणी बेपत्ता

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी) : मॉसाहेब जिजाऊंच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मातृतिर्थ बुलढाणा जिल्ह्यात मुली आणि महिला बेपत्ता होण्याची जणूकाही गळतीच लागली आहे. तरुण मुली आणि व्यक्ती बेपत्ता होण्याचे सत्र अविरत सुरूच असून आता पुन्हा दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांतर्गत दोन तरुणी बेपत्ता झाल्याची बाब समोर आली आहे. कोकलवाडी (ता.नांदुरा) आणि घिर्णी (ता. मलकापूर) येथील दोन १८ ते १९ वर्षीय तरुणी अचानक बेपत्ता झाल्या आहे. गेल्या आठ दिवसांपासून ‘हिंदवार्ता’ सातत्याने या विषयावर प्रकाश टाकत आहे, हे विशेष!

विदर्भाचे प्रवेशव्दार असलेल्या मलकापूर शहर पोलीस स्टेशन हद्दित येणाऱ्या घिर्णी येथून दिपाली गणेश भारती (वय १८ वर्षे) ही तरुणी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ६. ३० वाजेच्या सुमारास घरात कोणाला काहीच न सांगता निघून गेली. कुटुंबियांनी तीचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही. दरम्यान, तीचे वडील गणेश गुणवंत भारती यांनी मलकापूर शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी हरविल्याची नोंद केली आहे. दिपालीची उंची ५ फूट, रंग गोरा, बांधा सडपातळ असून तीने पांढऱ्या रंगाचे कपडे परिधाण केलेले आहेत. तीच्या बाबतीत काही माहिती मिळाल्यास मलकापूर शहर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन तपास अधिकारी पोलीस अंमलदार सचिन पाटील यांनी केले आहे.

दुसरी घटना नांदुरा तालुक्यातील कोकलवाडी येथून समोर आली. कोकलवाडी येथे आपल्या कुटुंबियांसोबत राहणारी मल्लेश्वरी सुभाषसिंह राजपूत (वय १९ वर्षे) ही तरुणी २७ जानेवारी २०२६ पासून बेपत्ता आहे. तीचे वडील सुभाषसिंह राजपूत यांनी दिलेल्या माहितीवरुन मल्लेश्वरी नांदुरा येथे अंबुसकर यांच्याकडे कराटे क्लासला जात असल्याचे सांगुन घरातून बाहेर पडली होती. मात्र, उशरापर्यंत ती घरी परतलीच नाही. कुटुंबियांनी तीचा सर्वत्र शोध घेतला. परंतु ती मिळून आली नाही. या प्रकरणी नांदुरा पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आली आहे. मल्लेश्वरीची उंची ५ फूट ४ इंच, बांधा मजबूत, चेहरा लांबट गोल, रंग गोरा, काळे लांब केस असून तीने काळ्या रंगाची जीन्स, पांढऱ्या रंगाचा फुल बाह्यांचा टी-शर्ट परिधाण केला असून पायात गुलाबी रंगाची स्लीपर आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार सैय्यद हे करीत आहेत.
आम्ही सातत्याने बेपत्ता व्यक्तींच्या आकडेवारीवर प्रकाश
टाकत आहोत. ही केवळ बातमी नसून समाजासाठी एक धोक्याची घंटा आहे. प्रशासनाने या वाढत्या घटनांमागील मूळ कारणांचा शोध घेणे आता अनिवार्य झाले आहे, हे विशेष!  पोलीस प्रशासन या प्रकरणांचा गांभीर्याने तपास करत असले तरी, पालकांनी आपल्या मुलांशी संवाद साधणे आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे तितकेच गरजेचे झाले आहे, हे तेवढेच खरे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *