क्राईम जगत

काकुने पळविले पुतणीला; पैशांसाठी लग्नही लावून दिले!

मेहकर,(प्रतिनिधी): साखरखेर्डा येथून एक अल्पवयीन मुलगी २९ डिसेंबर रोजी सायंकाळी बेपत्ता झाली होती. या प्रकरणी साखरखेर्डा पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून मुलीचे अपहरण झाले नव्हते, तर नात्याने काकु असलेल्या महिलेने मुलीला पळवून नेत एका युवकासोबत तीचे लग्न लावून दिल्याचे तपासात उघड झाले आहे. नव्हेतर आरोपी काकुसह एका युवकाला साखरखेर्डा पोलिसांनी जळगाव खांदेश येथून बेड्या ठोकल्या. दरम्यान, त्यांना आज ९ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने काकूची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली असून, युवकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
साखरखेर्डा येथील एक अल्पवयीन मुलगी २९ डिसेंबर रोजी सायंकाळी घरातून अचानक बेपत्ता झाली होती. या प्रकरणी मुलींची आजी केसरबाई पारधे यांनी साखरखेर्डा पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. पोलिसांनी सदर बाब गांभीर्याने घेत तपासचक्रे फिरवली. तांत्रिक व गोपनीय माहिती काढून मिराबाई पारधे आणि शुभम पाटील याच्या जळगाव खांदेश येथून मुसक्या आवळल्या. आरोपींची कसून चौकशी केली असता, नात्याने काकू लागणाऱ्या मिराबाई पारधे हिने सदर मुलीला काळी-पिवळी वाहनाले चिखली येथे बोलावले. तेथून मुलीला सोबत घेऊन जळगाव खांदेश येथे नेले. तेथील शुभम विनोद पाटील या युवकासोबत तीचा विवाह लावून दिला. या व्यवसायात काकूने काही पैसे घेतल्याचे देखील पोलीस चौकशीत समोर आले आहे. विशेेष म्हणजे सदर महिलेचे गुजरात राज्यात अनेक व्यक्तींसोबत कनेक्शन असल्याचेही निष्पन्न झाले. या अगोदर अशाच प्रकारे काही मुलींना आपल्या जाळ्यात अडकवून तीने सदर मुलींचे इतर समाजातील गरजू मुलांसोबत लावल्याचे समजते. सदर महिलेचे चार ते पाच वेळा स्वत: विवाह करून अनेक युवकांना गंडविल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आज ९ फेब्रुवारी रोजी आरोपींना जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने महिला आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर शुभम विनोद पाटील याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्ह्याचा तपास ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली साखरखेर्डा पोलीस करीत आहेत. दरम्यान, काल संध्याकाळी आणखी एक युवती घरुन पसार झाली असून तीने परस्पर एका मुलांसोबत विवाह केल्याचे बोलल्या जात आहे. या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल नसली, तरी सदर मुलीचे एका मुलासोबत लग्न झाल्याचे फोटो पोलिसांना प्राप्त झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *