डोणगाव आणि अमडापूरमधून दोन विवाहित बेपत्ता
अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्यात महिला बेपत्ता होण्याच्या घटना काही थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. गेल्या पंधरा दिवसांत बेपत्ता झालेल्यांचा आकडा अर्धशतकाच्या घरात पोहोचला असतानाच मंगळवारी पुन्हा दोन वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दीतून विवाहित महिला बेपत्ता झाल्याच्या नोंद पोलिसांच्या अभिलेखावर करण्यात आली आहे. यामध्ये मेहकर तालुक्यातील शहापूर येथील मनीषा वाकोडे आणि चिखली तालुक्यातील धोत्रा नाईक येथील वर्षा भांडवले, या महिलेचा समावेश आहे.
डोणगाव पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या शहापूर (ता.मेहकर) येथील मनीषा शुभम वाकोडे (वय २३ वर्षे) ही महिला ९ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास राहत्या घरातून बेपत्ता झाली आहे. पती शुभम निंबाजी वाकोडे यांनी याप्रकरणी डोणगाव पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी हरवल्याची नोंद घेतली आहे. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. बेपत्ता मनीषाचा रंग सावळा असून उंची ४.५ फूट आहे. तिने पांढऱ्या रंगाचा पंजाबी ड्रेस आणि पायात गुलाबी सँडल घातलेली होती. तसेच तिच्या उजव्या हातावर “परी” असे नाव गोंदलेले आहे. उपरोक्त महिलेसंदर्भात काही माहिती मिळाल्यास डोणगाव पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन तपास अधिकारी पोलीस अंमलदार संजय घिके यांनी केले आहे.
धोत्रा नाईक (ता.चिखली) येथील रहिवासी असलेल्या वर्षा राम भांडवले (वय २७ वर्षे) या ९ फेब्रुवारीच्या पहाटे १ वाजता दरम्यान अचानक घरातून बेपत्ता झाल्या. पती राम किसन भांडवले हे घरात झोपलेले होते. कुटुंबीयांनी नातेवाईक आणि परिसरातील त्यांचा शोध घेतला. मात्र, त्या मिळून आल्या नाही. याप्रकरणी राम किसन भांडवले यांनी अमडापूर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मिसिंग दाखल केली आहे. वर्षा यांचा रंग गोरा असून उंची ५ फूट आहे. त्यांची शरीरयष्टी मजबूत आहे. तसेच त्यांनी लाल व काळपट रंगाची साडी आणि लाल ब्लाउज परिधान केलेले आहे. उपरोक्त महिलेसंदर्भात काही माहिती मिळाल्यास अमडापूर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन तपास अधिकारी महिला पोलीस अंमलदार वंदना बोर्डे यांनी केले आहे.

