लेझीमच्या सरावात घुसून तरुणीचा विनयभंग
अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): शेगाव शहरातील व्यंकटेशनगर परिसरात लेझीमचा सराव करणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणीचा हात धरून विनयभंग केला. एवढ्यावरच न थाबता तरुणीच्या घरात घुसून आरोपीने तिला जीवाने ठार मारण्याची धमकी दिली. शिवजयंती उत्सवाची तयारी सुरू असतानाच हे धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांत भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१९ फेब्रुवारी रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. सालावादाप्रमाणे यांनाही संतनगरी शेगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. जयंती मिरवणुकीत मुलींचे लेझीम पथक असणार असल्याने मुलींकडून लेझीमचा सराव करून घेण्यात येत आहे. शहरातील व्यंकटेशनगर परिसरात राहणारी आणि महाविद्यालयात शिक्षण घेणारी एक १९ वर्षे तरुणी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास तिच्या घरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर इतर मुली आणि महिलांसह लेझीमचा सराव करत होती. त्यावेळी याच परिसरात राहणारा आरोपी सनी सोळंके (वय २१ वर्षे) हा सदर ठिकाणी गेला. नव्हे तर त्याने सर्वांसमोर तरुणीचा हात पकडला आणि “माझ्यासोबत चाल”, असे म्हणत तिची छेड काढली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या या तरुणीने आरोपीच्या हाताला झटका मारून त्याला कडाडून विरोध केला आणि आपल्या घरात पळून गेली. तरीही उद्धटपणा न थांबलेल्या आरोपीने थेट पीडितेच्या घरात प्रवेश केला. एवढ्यावरच न थांबता पिढीतेला अश्लील भाषेत शिवीगाळ करून “तू माझ्यासोबत आली नाहीस, तर तुला जिवाने मारून टाकील”, अशी धमकी दिली. पीडितेने आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूच्या महिला व नातेवाईकांनी तिच्या घराकडे धाव घेतली. लोकांना येताना बघून आरोपीने घटनास्थळावरून धूम ठोकली.
घटनेनंतर पीडितेने आपल्या चुलत भावासह शेगाव शहर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी सनी सोळंके याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ७४, ७५, ३५२, ३५१ (२) आणि ३३३ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार संजय करुटले हे करीत आहेत.

