सुसाट कारच्या धडकेत खामगावच्या तरुणाच्या स्वप्नांचा चुराडा
खामगाव,(प्रतिनिधी) :काम करून शिक्षण घेत स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या एका विद्यार्थ्याचा सुसाट कारच्या धडकेत मृत्यू झाला. तर, दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. हर्सूलमधील जुना जकात नाका येथे ८ फेब्रुवारीच्या रात्री हा अपघात झाला. या प्रकरणी हर्सूल पोलिसांत कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिकेत दिलीप निंबाळकर (वय २३ वर्षे) रा. न्यू पहाडसिंगपुरा, मुळ रा. लांजुळ (ता. खामगाव जि.बुलढाणा), असे मृत विद्यार्थ्याचे तर मनोज सदाशिव भिलन, असे जखमीचे नाव आहे, ८ फेब्रुवारी रोजी सकाळी अनिकेतसह मनोज सदाशिव भिलन, अविनाश नितावणे, विशाल भंडारे व इतर तरुण आईसाहेब लॉन्स येथे लग्नात केटरिंगच्या कामासाठी गेले होते. काम आटोपल्यानंतर रात्री उशिरा वाहनाची कोणतीही सोय नसल्याने सर्वजण पायी पहाडसिंगपुराकडे निघाले. हर्सूल जुना जकात नाक्याच्या पुढे मागून येणाऱ्या सुसाट कार क्रमांक एमएच-२०-एफयू-७५७५ चा चालक मंगेश कोलते याने अनिकेत निंबाळकर व मनोज भिलन यांना जोराची धडक दिली. धडकेमुळे दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास अनिकेतचा मृत्यू झाला. मनोज भिलन याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलीस निरीक्षक स्वाती केदार यांनी दिली.
कुटुंबीयांचेही स्वप्न भंगले
अनिकेत निंबाळकर याची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. तो अभ्यासात हुशार असल्याने कुटुंबीयांनी त्याला शिक्षणासाठी संभाजीनगरात पाठविले होते. तो समाज कार्य (एमएसडब्ल्यु) विषयात पी.एचडीचे शिक्षण घेत होता. तसेच, स्पर्धा परीक्षेचीही तयारी करत होता. आई आणि भाऊ कंपनीत जाऊन तर वडील शेती करून त्याला शिक्षणासाठी मतद करीत होते. तसेच, अनिकेतही मिळेल ते काम करून खर्चाला हातभार लावायाचा. शिकूण मोठा अधिकारी व्हावे, अशी सर्वांची इच्छा होती. मात्र, या अपघाताने अनिकेतसह निंबाळकर कुटुंबीयांचे स्वप्न भंगले.

