क्राईम जगत

१७ वर्षीय मुलीचे अपहरण; मलकापूर तालुक्यात खळबळ

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी): संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी गेलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची खळबळजनक घटना मलकापूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या घिर्णी येथे समोर आली. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बहापुरा (ता.मलकापूर) येथील रहिवासी श्रीकृष्ण रामभाऊ सातव (वय ४० वर्षे) यांची मुलगी संगीता सातव (वय १७ वर्षे ८ महिने) ही ८ फेब्रुवारी २०२६ रोजी तिच्या आजी सत्यभामाबाई सोबत घिर्णी येथे संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी गेली होती. दुपारी ३ वाजेच्या सुमारास, संगीताची आजी लघुशंकेसाठी गेली असता, काही वेळातच संगीता तिथून बेपत्ता झाली. आजीने परिसरात तिचा शोध घेतला, मात्र, संगीता कुठेही मिळून आली नाही.श्रीकृष्ण सातव यांनी देखील नातेवाईक, मित्र-मैत्रिणी आणि परिसरात तिचा शोध घेतला. परंतु संगीताचा कुठेच थांगपत्ता लागला नाही.

याप्रकरणी श्रीकृष्ण सातव यांनी मलकापूर शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी भारतीय न्याय संहिताचे कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. बेपत्ता संगीताचे वय १७ वर्षे ८ महिने २७ दिवस, उंची ५ फूट, रंग गोरा, बांधा सडपातळ असून तिने अंगात काळ्या रंगाचा टॉप आणि पांढऱ्या रंगाची पॅन्ट घातलेला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार सचिन पाटील हे करत आहेत. सदर मुलीबाबत काही माहिती मिळाल्यास मलकापूर शहर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *