क्राईम जगत

“त्या”ऊसतोड मजुराला अपहरण करून रात्रभर ठेवले होते डांबून

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी) : बुलढाणा जिल्ह्यातील जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या देऊळगाव साकर्षा-पारखेड परिसरातून सावरगाव (जि. अकोला) येथील देविदास राठोड (वय ५० वर्षे) या मजुराचे ७ फेब्रुवारी रोजी दुपारी पाच ते सहा जणांनी कारमध्ये कोंबून अपहरण केल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने चान्नी (जि.अकोला) पोलिसांत केली होती. ठाणेदार रवींद्र लांडे यांनी या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली. दरम्यान, देविदास राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून जानेफळ पोलिसांनी चौघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
सावरगाव (जि.अकोला) येथील रहिवासी असलेले देविदास सूर्यभान राठोड (वय ५० वर्षे) हे ७ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजता दरम्यान पारखेड फाट्याजवळ कामावर होते. त्यावेळी आरोपी शामराव बाबुसिंग राठोड, संदीप जाधव, तेजराव राठोड आणि धोडीराम जाधव (सर्व रा. पारखेड) हे सदर ठिकाणी गेले. “आपल्याला ऊस तोडीचा हिशोब करायचा आहे, तू आमच्यासोबत चाल,” असे सांगून त्यांनी देविदास राठोड यांना सोबत चालण्यास सांगितले.मात्र, राठोड यांनी त्यांच्या सोबत जाण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या आरोपींनी त्यांना जबरदस्तीने उचलुन पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये कोंबले आणि सुसाट वेगाने मेहकर बायपास रोडच्या दिशेने निघून गेले. भरदिवसा घडलेल्या या अपहरणाच्या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
आरोपींनी देविदास राठोड यांना अज्ञात ठिकाणी नेऊन “तू आमच्याकडून एक लाख रुपये उचल घेतली आहेस, ती परत दे किंवा काम पूर्ण कर,” अशी मागणी केली. “मी यापूर्वीच तुम्हाला ३० हजार रुपये दिले असून कामही पूर्ण केले आहे, आता कोणतेही पैसे बाकी नाहीत.”, असे राठोड यांनी त्यांना सांगितले. त्यांच्या या उत्तरामुळे संतप्त झालेल्या आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच रात्रभर कारमध्ये डांबून ठेवत पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता देविदास राठोड यांनी लघुशंकेचे निमित्त करून आरोपींच्या हातावर तुरी देऊन सदर ठिकाणावरून निसटले आणि थेट जानेफळ पोलीस स्टेशन गाठले.
या प्रकरणी देविदास राठोड यांच्या फिर्यादीवरून जानेफळ पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम १४० (३), ११५ (२),  ३५१ (२), ३५२ आणि कलम ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार अतुल पचार हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *