क्राईम जगत

वेश्या संबोधून महिलेचे चारित्र्यहनन

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी) : आरोपींनी आधी महिलेला गाठले. तिला अर्वाच्च आणि अश्लील भाषेत शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता तिला वेश्या संबोधन तिचा विनयभंग केला. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना नुकतीच जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या देउळगाव सार्कशा येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे मेहकर तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

देउळगाव सार्कशा (ता.मेहकर) येथील रहिवासी असलेल्या एका ३५ वर्षीय महिलेचा पुतण्या आणि यातील आरोपी यांच्यामध्ये काही कारणावरून वाद झाला होता. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास याच वादाच्या कारणावरून आरोपींनी संगणमत करून सदर महिलेला गाठले. त्यांना अर्वाच्च आणि अश्लील भाषेत शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता “तू वेश्या आहेस, मोकाट आहेस”, असे म्हणून त्यांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना चापटा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी सदर महिलेने जानेफळ पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी जितेश भीमराव चव्हाण, सरला भीमराव चव्हाण आणि रामेश्वर चव्हाण (सर्व रा. देउळगाव सार्कशा) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहित कलम २९६, ११५ (२), ३५२, आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार अतुल पवार हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *