खेळ व मनोरंजन

एशियन आंतरराष्ट्रीय लॅक्रोस स्पर्धेत भारतास सुवर्णपदक

अभिनय बोर्डे

बुलढाणा,(प्रतिनिधी): आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेची मान्यता प्राप्त अस-लेला आणि सन २०२८ च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत समाविष्ट झालेला लॅक्रोस खेळ सध्या वेगाने लोकप्रिय होत आहे. याच खेळाच्या एशियन आंतरराष्ट्रीय लॅक्रोस अजिंक्यपद स्पर्धा २ ते ५ फेब्रुवारी दरम्यान सौदी अरेबिया येथे पार पडल्या. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्याचे खेळाडू सागर नंदकिशोर बोर्डे यांनी भारतीय लॅक्रोस संघाचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कामगिरी बजावली.

राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केल्यानंतर त्यांची भारतीय संघात निवड झाली होती. या स्पर्धेत भारतीय संघाने सौदी अरेबिया, पाकिस्तान व इराक या बलाढ्य संघांचा पराभव करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या ऐतिहासिक विजयात सागर बोर्डे यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले. बुलढाणा जिल्हा लॅक्रोस खेळाचे मार्गदर्शक तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रीराम निळे यांनी संघाला मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच महाराष्ट्र लॅक्रोस असोसिएशनचे सचिव मोहिद बाबर यांनीही खेळाडूंचे कौतुक केले आहे. सागर नंदकिशोर बोर्डे यांच्या या यशामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून, सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *