क्राईम जगत

‘संस्कृती’ हत्याकांडातील आरोपी जिल्ह्यातील दुसरबीडचा

आनंद इंगळे
सिंदखेड राजा, (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यातील सारूळ शिवारात अर्धनग्न अवस्थेत मिळून आलेल्या बुलढाण्याची लेक अर्थात मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील संस्कृती काळे हीच्या खुनाचा उलगडा करण्यात नाशिक पोलिसांना यश आले. चारित्र्याच्या संशयातून प्रियकरानेच आपल्या साथीदारांच्या मदतीने १६ वर्षीय प्रेयसीचा मानेत चाकू भोसकून तिचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. नव्हेतर अल्पावधीत नाशिक पोलिसांनी संशयित प्रियकरासह गुन्ह्यात सहभागी असलेल्या त्याच्या मित्रास बेड्या ठोकल्या. अथर्व गजानन देशमुख (वय १९ वर्षे) रा.हनुमान गल्ली, दुसरबीड (ता.सिंदखेड राजा, जि.बुलढाणा) हल्ली मुक्काम सातपूर कॉलनी (नाशिक) व सुमित देवानंद सानप, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

सारूळ (जि.नाशिक) शिवारात २० फेब्रुवारी रोजी एका अनोळखी युवतीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आला होता. मात तरुणीच्या मानेत चाकू खुपसून तिची हत्या करण्यात आल्याचा अंदाज वर्तवित पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. मृतदेह परिसरात पिझ्झाचा तुकडा वगळता कुठलाही धागादोरा पोलिसांच्या हाती न लागल्याने मुलीची ओळख पटवून या हत्येचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनात वाडीवऱ्हेचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर आव्हान पेलत तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी राज्यभरात मिसिंग झालेल्या मुलींची माहिती घेतली. त्यावेळी अकोला येथील सिव्हिल लाइन पोलिसांत संस्कृतीकाळे नावाची मुलगी बेपत्ता असल्याची नोंद असल्याची माहिती वाडीवऱ्हे पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्या पालकांशी संपर्क साधून मृत मुलीची ओळख पटविली. पोलीस तपासात कुटुंबीयांनी मुळचा दुसरबीड येथील रहिवासी असलेला आणि त्र्यंबकेश्वर रोडवरील नामांकित शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेल्या अथर्व देशमुख याच्यावर खूनाचा संशय व्यक्त केला. त्यामुळे पोलीस यंत्रणेला तपासाची दिशा मिळाली.

दरम्यान, अथर्व सातपूर कॉलनीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे, सहायक आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूरचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश अहिरे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मडांगे, दीपक खरपडे, राहुल खांडबहाले, अमोल मोरे यांच्या पथकाने पोलिसांनी सातपूर कॉलनी गाठली असता, अथर्व आपल्या मित्राच्या रूमवर येऊन रक्ताने माखलेले कपडे बदलून गेल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सातपूर आणि भद्रकाली पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत, खाजगी कॅबने छत्रपती संभाजीनगरकडे पोबारा करण्याच्या तयारीत असलेल्या अथर्वला द्वारका भागात बेड्या ठोकल्या. संदीप फाउंडेशन महाविद्यालय परिसरातून सहआरोपी सुमित सानपच्या मुसक्या आवळण्यात आल्या. तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

तरुणासोबत बोलणे जिवावर बेतले

संस्कृती आणि अथर्व यांच्यात प्रेमसंबंध होते. अथर्व सण-उत्सवानिमित्त अकोला गाठून संस्कृतीची भेट घ्यायचा. दरवेळी तिच्याणी संपर्क साधून जाणाऱ्या अथर्वने यावेळी मात्र संस्कृतीला न सांगता अकोला गाठले. तिच्यावर पाळत ठवेत कॉलेज कॅम्पसमध्ये तीला एका तरुणाबरोबर वारंवार वावरताना बघितल्याने त्याच्या डोक्यात राग गेला. यातून त्याने तिला डस्टर कारमधून पळवून नेत मित्रांच्या मदतीने वाटेतच संस्कृतीच्या मानेत चाकू भोसकून तिची हत्या केली आणि मृतदेह वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनच्या हद्दीत फेकून दिल्याची कबुली पोलिसांना दिली.

शालेय जीवनातच बहरले होते प्रेम

सिंदखेड राजा तालुक्यातील देशमुख आणि काळे परिवारात गेल्या दोन पिढ्यांपासून घरोब्याचे संबंध आहेत. एकमेकांकडे येणे-जाणे असल्याने शालेय जीवनातच अथर्व देशमुख आणि संस्कृती काळे यांच्यातील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले होते. दोन्ही कुटुंबीयांच्याही ही बाब लक्षात आली होती. एकोप्यातील दुरावा टाळून मार्ग काढण्यासाठी दहावी उत्तीर्ण झालेल्या दोघांनाही पुढील शिक्षणासाठी वेगवेगळ्या शहरांत पाठविण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला. त्यानुसार अथर्वला नाशिक येथील महिरावणी शिवारातील एका नामांकित शिक्षण संस्थेत, तर संस्कृतीला अकोला शहरात ठेवण्यात आले, हे विशेष!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *