स्मार्ट बुलढाणा

चिखली कडकीत बंद: व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चिखली,(प्रतिनिधी) : चिखला काकड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा स्थापनेदरम्यान झालेल्या वादातून संजीवनी वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज २३ फेब्रुवारी रोजी सकाळ पासूनच चिखली बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला सर्वपक्षीय पदाधिकारी, विविध सामाजिक संघटना तसेच चिखलीकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सकाळपासूनच शहरातील मुख्य बाजारपेठ, किरकोळ दुकाने, व्यापारी आस्थापने व विविध व्यावसायिक प्रतिष्ठाने पूर्णतः बंद ठेवण्यात आली होती. नागरिकांनीही आपले दैनंदिन व्यवहार स्थगित ठेवून घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. शहरातील प्रमुख चौकात निदर्शने करण्यात आली.
घटनेतील संबंधित आरोपींवर तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करावी, अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली.
प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करावी, अन्यथा पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. दरम्यान, बंद शांततेत पार पडला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासन सतर्क होते. तसेच नागरिकांनीही सहकार्याची भूमिका घेतली. शहरात सर्वत्र शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *