क्राईम जगत

ब्रेकिंग! बुलढाण्यात गृहनिर्माण संस्थेच्या नावाखाली सभासदांची फसवणूक

बुलढाणा,(प्रतिनिधी) : जमिनीच्या खरेदी किंवा विक्रीच्या व्यवहारात कुठे ना कुठे, कोणाची ना कोणाची फसवणूक झाल्याच्या बातम्या रोज कानावर पडतात. बुलढाणा जिल्ह्यात असे प्रकार नसल्यात जमा असल्याचे नागरिक बोलतात. मात्र, नागरिकांच्या या बोलण्याला छेद देणारा फसवणुकीचा एक प्रकार नुकताच बुलढाणा शहरात समोर आला आहे. शहरातील नियोजित शिवराज गृहनिर्माण संस्थेच्या नावाखाली सभासदांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली असून तब्बल २५ वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकरणाचा नुकताच सोक्षमोक्ष लागला असून विद्यमान न्यायालयाच्या कलम १५६ (३) नुसार दिलेल्या आदेशानंतर बुलढाणा शहर पोलिसांत ७ जणांवर आणि ३ मृत, अशा एकूण १० आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे बुलढाणा शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
मुळचे पुणे येथील रहिवासी असलेले सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक महेश लक्ष्मणराव दुधाळकर (वय ६७ वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बुलढाणा येथील सर्वे नंबर ३३/३ मधील नियोजित शिवराज गृहनिर्माण संस्थेच्या जमिनीच्या व्यवहारात शिवराज गृहनिर्माण संस्थेचे मुख्य प्रवर्तक शामसुंदर गंगाधर पाटणकर (मयत), दिगंबर नारायण महाले (वय ७६ वर्षे) रा.खामगाव, निर्मला दिगंबर महाले (वय ७१ वर्षे) रा. खामगाव, चंद्रशेखर दिगंबर महाले (वय ५३ वर्षे) रा.खामगाव, वैद्यकीय व्यावसायिक डॉ. गणेश दिगंबर महाले (वय ४९ वर्षे) रा.खामगाव, सुरेश गणेशराव पाटील (वय ६० वर्षे) रा. बुलढाणा, भारती सुरेश पाटील (वय ५५ वर्षे) रा. बुलढाणा, गणेशराव नामदेवराव पाटील (मयत) आणि वच्छलाबाई गणेशराव पाटील (मयत) या आरोपींनी संगनमत करून कट रचला. संस्थेचे सभासद असलेल्या अनेक नागरिकांकडून त्यांनी पैसे घेऊन त्यांना भूखंड किंवा अपेक्षित लाभ न देता त्यांची फसवणूक केली. हा प्रकार ७ सप्टेंबर २००१ पासून सुरू होता. या संदर्भात महेश दुधाळकर यांनी वारंवार पाठपुरावा करूनही दाद मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी न्यायालयाचे दार ठोठावले होते.
दरम्यान, न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य ओळखून बुलढाणा शहर पोलिसांना तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यामुळे २५ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ज्येष्ठ नागरिकाने दिलेल्या लढ्याला यश आले असून, या कारवाईमुळे बुलढाण्यातील भूखंड माफिया आणि फसवणूक करणाऱ्या संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ६१ (१), ३१६ (२), ३१८ (४), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास बुलढाणा शहर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *