धाडमध्ये दिवसाढवळ्या १० बकऱ्यांची चोरी
अभिनय बोर्डे
धाड (प्रतिनिधी) : चोरट्यांची हिंमत चांगलीच वाढली असून त्यांनी आता आपला मोर्चा मुक्या जनावरांकडे वळवला आहे. धाड येथील नशिबनगर भागातून चोरट्यांनी तब्बल १० बकऱ्या चोरून नेल्याचे खळबळजनक घटना नुकतीच समोर आली. विशेष म्हणजे, या बकऱ्या भरदिवसा घरासमोरून लंपास करण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
धाड येथील नशिबनगर परिसरात रफीक बेग मुन्शी बेग (वय ५२ वर्षे) यांचे घर आहे. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ ते ३ वाजेच्या सुमारास, जेव्हा सर्वत्र वर्दळ असते, अशा वेळी अज्ञात चोरट्यांनी नशिब नगरमधील वार्ड नं. ५ मधून एकापाठोपाठ एक अशा १० बकऱ्या चोरून नेल्या. चोरट्यांनी केवळ एकाच व्यक्तीला नाही, तर परिसरातील पाच जणांना लक्ष्य केले. चोरीला गेलेल्या मालाचा
यामध्ये रफीक बेग मुन्शी बेग यांच्या दोन बकऱ्या (किंमत ११ हजार रुपये), ओसामा खान आबीद खान यांच्या दोन बकऱ्या (किंमत १२ हजार रुपये), शेख ताहेर शेख सत्तार यांच्या दोन बकऱ्या (किंमत १० हजार रुपये), मोहम्मद आसीफ जमादार यांच्या दोन बकऱ्या (किंमत १२ हजार रुपये), फययाज आहाद सौदागर यांच्या दोन बकऱ्या (किंमत १६ हजार रुपये), अशा एकूण दहा बकऱ्या किंमत ६१ हजार रुपयांचा समावेश आहे.
याप्रकरणी २४ फेब्रुवारी रोजी रफीक बेग मुन्शी बेग यांनी धाड पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिताचे कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार श्रीकृष्ण चव्हाण हे करीत आहेत.

