महाराष्ट्र माझा

‘हिंदुत्व आणि ओबीसी कार्ड फक्त राजकारणापुरतेच का?’

बीड,(प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्ष स्वतःला हिंदुत्ववादी आणि ओबीसींचे कैवारी म्हणवून घेतो, मात्र प्रत्यक्षात पीडित हिंदू महिलांना न्याय देण्यात हा पक्ष अपयशी ठरला आहे. गोपीचंद पडळकर हे हिंदू स्त्रियांची अब्रू घालवण्याचे काम करत आहे, असा घणाघाती आरोप करुणा धनंजय मुंडे यांनी केला आहे. बीडमधील एका ताज्या प्रकरणाचा दाखला देत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा मुंडे यांनी अनेक खळबळजनक प्रकरणांचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या की, संपदा मुंडे, पूजा चव्हाण, गौरी गर्जे, ज्ञानेश्वरी मुंडे आणि खुद्द माझ्यावर म्हणजे करुणा धनंजय मुंडे झालेला अन्याय जगजाहीर आहे. आता बीडमध्ये एका जीएसटी अधिकाऱ्याची पत्नी न्यायासाठी रस्त्यावर उतरली आहे. आता कुठे लपून बसलेले आहात. जर तुम्ही खरोखरच मोठे हिंदुत्ववादी आणि ओबीसींचे नेते असाल, तर या महिलांना न्याय का मिळत नाही?, असा सवाल करत त्यांनी थेट भाजपावर निशाणा साधला. उपरोक्त महिलांवर झालेल्या अन्याय,अत्याचारामुळे भाजपमध्ये बसलेल्या मोठ्या मंत्र्यांचा हात आहे. हे मंत्री केवळ स्वतःच्या पदांचा वापर राजकारणासाठी करत असून, महिलांच्या सन्मानाचा प्रश्न येतो, तेव्हा ते मौन बाळगतात, अशी टीकाही त्यांनी केली. “हिंदू महिलांना न्याय देण्याची तुमची ताकद नाही का? फक्त ओबीसी-मराठा आणि हिंदू-मुस्लिम वाद उकरून काढून राजकारण करणे, हेच तुमचे ध्येय आहे का?” असा सवाल त्यांनी विचारला आहे. यापुढे असे चालू देणार नाही, आणि चालणार पण नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *