मलकापुरात ‘मानस हॉस्पिटल’चा मनमानी कारभार
मलकापूर, (प्रतिनिधी): शहरातील चाळीस बिघा परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या मानस हॉस्पिटलच्या नियोजनशून्य कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक आणि वाहनधारकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयाने पार्किंगची कोणतीही व्यवस्था न केल्यामुळे मुख्य रस्त्यावर वाहनांचा खच पडत असून, यामुळे परिसरात गंभीर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. याप्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी आक्रमक पवित्रा घेत २ मार्च रोजी बुलढाणा येथील नगर रचनाकारांकडे लेखी निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
चाळीस बिघा हा परिसर मलकापूरमधील अत्यंत गजबजलेला भाग आहे. येथे उपजिल्हा रुग्णालयासह अनेक खासगी दवाखाने असल्याने दिवसभर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी वर्दळ असते. अशा संवेदनशील भागात ‘मानस हॉस्पिटल’ने नुकतेच आपल्या इमारतीचे नूतनीकरण केले आहे. नियमानुसार, कोणत्याही व्यावसायिक किंवा वैद्यकीय इमारतीला पार्किंगसाठी जागा सोडणे अनिवार्य असते. मात्र, मानस हॉस्पिटल प्रशासनाने या नियमांना केराची टोपली दाखवत पार्किंगसाठी कोणतीही जागा उपलब्ध करून दिलेली नाही. “एकीकडे सामान्य माणसाने रस्त्यावर गाडी उभी केली तर पोलीस दंड आकारतात, मग इतक्या मोठ्या प्रभावशाली रुग्णालयावर प्रशासन मेहेरबान का? धनदांडग्या संस्थांसाठी नियम वेगळे आणि सामान्यांसाठी वेगळे आहेत का?” असा सवाल आता परिसरातील नागरिक विचारत आहेत.
या संदर्भात अजय टप यांनी दिलेल्या निवेदनात स्पष्ट म्हटले आहे की, नगर रचना विभागाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी. इमारतीच्या नकाशात पार्किंगची जागा दर्शवली असतानाही तिचा वापर का केला जात नाही, याची शहानिशा करून संबंधित रुग्णालय प्रशासनावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, तर लोकहितासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
रुग्णवाहिकाही अडकल्या; जीवाशी खेळ सुरू!
पार्किंग नसल्याने रुग्ण आणि नातेवाईक आपली वाहने थेट मुख्य रस्त्यावर उभी करत आहेत. यामुळे रस्ता अरुंद होऊन तासनतास वाहतूक कोंडी होत आहे. याचा सर्वाधिक फटका शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आपत्कालीन सेवांना बसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गंभीर रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकांनाही या कोंडीतून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. जर या वाहतूक कोंडीमुळे एखाद्या रुग्णाचा जीव गेला, तर त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल अजय टप यांनी उपस्थित केला आहे.

