क्राईम जगत

म्हणे “माझ्याशी लग्न कर, नाहीतर अख्ख्या कुटुंबाला संपवून टाकीन!” 

अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी): कामासाठी बाहेर पडलेल्या २० वर्षीय तरुणीचा आरोपीने हात धरून तिला लग्नाची मागणी घालत जीवे मारण्याची धमकी दिल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील जयपूर येथे समोर आली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी उपरोक्त आरोपी विरुद्ध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे.
जयपुर (ता.मोताळा) येथील रहिवासी असलेली वीस वर्षीय तरुणी सकाळी १० वाजेच्या सुमारास काही कामानिमित्त गावातील पाण्याच्या टाकीजवळ गेली होती. त्यावेळी त्याच गावातील आरोपी किरण ज्ञानदेव सातव याने सदर तरुणीला एकटे बघून गाठले. वाईट उद्देशाने तरुणीचा हात पकडला आणि “तू माझ्यासोबत लग्न कर,” अशी जबरदस्ती केली. इतकेच नव्हे तर, “जर तू लग्न केले नाहीस, तर तुला आणि तुझ्या घरच्यांना जिवाने मारून टाकीन,” अशी धमकीही दिली. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे तरुणी प्रचंड घाबरली.
या प्रकरणी उपरोक्त तरुणीने बोराखेडी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी किरण सातव याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ७४, ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार श्रीकांत चिटवार हे करीत आहेत. एकाच समाजातील आणि एकाच गावातील हा प्रकार असल्याने परिसरात मोठी चर्चा सुरू आहे. भरवस्तीत पाण्याच्या टाकीजवळ अशा प्रकारे मुलीचा हात पकडून धमकी दिल्याने संताप व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *