अवघ्या १२ तासांत खुनाचा छडा लावत आरोपीच्या मुसक्या आवळल्या
मेहकर (प्रतिनिधी): जिल्ह्यात कायद्याचा धाक संपला की काय, असा प्रश्न विचारणाऱ्या गुन्हेगारांना मेहकर पोलिसांनी आज आपल्या धडाकेबाज कामगिरीने सणसणीत चपराक दिली आहे. खामखेड रोडवरील एमआयडीसी परिसरात एका तरुणाची निर्घृण हत्या करून पसार झालेल्या आरोपीला मेहकर पोलिसांनी अत्यंत कौशल्याने सापळा रचून अवघ्या १२ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या या ‘सुपरफास्ट’ कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
मेहकर पोलिसांना ४ मार्च २०२६ च्या सकाळी ९ वाजता मेहकर शहराबाहेर असलेल्या खामखेड रोडवरील एमआयडीसी परिसरातील एका शेतात एका अज्ञात तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह पडलेला असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहिती मिळताच मेहकर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ पंचनामा केला. मृतदेहाची अवस्था पाहता हा घातपाताचाच प्रकार असल्याचे स्पष्ट झाले होते. पोलिसांनी वेगाने चक्र फिरवली आणि मृतकाची ओळख पटवली. राहुल भानुदास बाजड (वय २८ वर्षे) रा. जांब आढाव (ता.रिसोड जि.वाशिम) असे मृताचे नाव असल्याचे निष्पन्न झाले. एका निष्पाप तरुणाची अशी निर्घृण हत्या झाल्याने परिसरात संतापाची लाट उसळली होती.
पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलीस अधिक्षक नीलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात मेहकर पोलिसांनी तपासासाठी चार वेगवेगळी पथके तयार केली. घटनास्थळावर फॉरेन्सिक लॅब, फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयाची सुई ओम शामराव केनवडकर ( वय ३६ वर्षे) रा.केनवड (ता.रिसोड) याच्याकडे वळली. त्यामुळे पोलिसांनी तातडीने केनवड येथे धाव घेऊन आरोपी ओम केनवडकर याला त्याच्याच शेतातून ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या ओमची जेव्हा पोलिसांनी ‘खाकी’ स्टाईलने विचारपूस केली, तेव्हा त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.
म्हणून केला खून
आरोपीने दिलेल्या कबुलीनुसार, मृतक राहुल हा मागील काही दिवसांपासून आरोपीच्या पत्नीला वारंवार त्रास देत होता. आरोपीने त्याला वारंवार समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण राहुल ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर संयम सुटलेल्या ओमने राहुलचा काटा काढण्याचे ठरवले. ३ मार्च रोजी त्याने राहुलला विश्वासात घेऊन मेहकरच्या एमआयडीसी परिसरात नेले आणि तिथे डोक्यात दगडाने प्रहार करून त्याची निर्घृण हत्या केली.
यांनी लावला छडा
हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मेहकर पोलीस आणि सायबर सेलने रात्रंदिवस एक केला. या मोहिमेत पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार यांच्यासह सपोनि संदीप बिरांजे, अशोक अवचार, पोउपनि गणेश कड, कांचन जारवाल, पोलीस अंमलदार सुरेश काळे, सुखदेव गव्हाणे, लक्ष्मण कटक, संजय पवार, अमोल परिहार, इब्राहिम परसुवाले, महिला पोलीस अंमलदार आम्रपाली सरकटे यांसह सायबर सेलच्या पथकाने मोलाची भूमिका बजावली.

