क्राईम जगत

महावितरणचा ‘शॉक’! ग्राहकांनी भरलेली लाखांची वीज बिलं कर्मचाऱ्यानेच पचवली

अजय टप 

मलकापूर, (प्रतिनिधी): सामान्य जनता रक्ताचं पाणी करून महावितरणची वाढीव वीज बिलं भरण्यासाठी धडपडत असताना, दुसरीकडे महावितरणच्याच एका कर्मचाऱ्याने ग्राहकांच्या विश्वासाला तडा दिला. चिखली तालुक्यातील अमडापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ईसोली कार्यक्षेत्रात ही धक्कादायक घटना घडली असून, महावितरणच्या एका कर्मचाऱ्याने ग्राहकांकडून गोळा केलेली ५ लाख ३९ हजार १२० रुपयांची रक्कम सरकारी तिजोरीत जमा न करता स्वतःच्या खिशात घातली आहे. या ‘विद्युत’ घोटाळ्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

ईसोली महावितरण कार्यक्षेत्राचा पदभार सांभाळणारा राम बद्रीनाथ बराटे नावाच्या कर्मचाऱ्यांकडे वीज बिल वसुलीची जबाबदारी होती. ग्रामीण भागातील शेतकरी आणि घरगुती ग्राहकांनी विश्वासाने आपली कष्टाची कमाई वीज बिलापोटी या कर्मचाऱ्याकडे सुपूर्द केली. नियमानुसार, ही सर्व रक्कम महावितरणच्या अधिकृत खात्यात किंवा सरकारी तिजोरीत ठराविक मुदतीत जमा करणे बंधनकारक होते. मात्र, राम बराटे याने तसे न करता, ही पाच लाखांहून अधिकची रक्कम स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी हडपली.

गेल्या काही दिवसांपासून ईसोली कार्यक्षेत्रातील हिशोबात तफावत जाणवू लागली होती. अनेक ग्राहकांनी बिलं भरूनही त्यांच्या नावावर थकबाकी दिसत होती. यामुळे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अंतर्गत चौकशी आणि लेखापरीक्षण सुरू केले. जयंत गोलाईत यांनी या प्रकरणाचा सखोल पाठपुरावा केला असता, राम बराटे याने गोळा केलेली ५ लाख ३९ हजार १२० रुपये रक्कम सरकारी दप्तरी जमाच झाली नसल्याचे समोर आले. हा प्रकार उघड होताच महावितरणमध्ये एकच खळबळ उडाली.

या गंभीर फसवणुकीप्रकरणी जयंत गोलाईत यांनी दिलेल्या तक्रारीवरून अमडापूर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी राम बद्रीनाथ बराटे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यानेच अशा प्रकारे डल्ला मारल्याने ग्राहकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *