महिलेचा विनयभंग करत पती-पत्नीला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण!
चिखली,(प्रतिनिधी) : शेतजमिनीच्या वादातून सख्ख्या दिराने आपल्या मुलांसह आणि पत्नीसह मिळून भावजय आणि भावावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना वाघापूर (ता. चिखली) शिवारात घडली आहे. याप्रकरणी रायपूर पोलीस स्टेशनमध्ये ५ जणांविरुद्ध विनयभंगासह मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
चिखली तालुक्यातील वाघापूर येथील रहिवासी असलेल्या वैशाली संजय ठेंग (वय ३५ वर्षे) या २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास पतीसह आपल्या शेतातील (गट क्र. २०१) मोटर बंद करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी तिथे असलेल्या संशयित आरोपी अशोक साहेबराव ठेंग याने “तू या जागेत कशी काय आली?” असे म्हणून त्यांच्यासोबत वाद उकरून काढला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपी अशोकने वैशाली यांचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने त्यांना खाली पाडले आणि हातातील काठीने पाठीवर, हातावर व डोळ्यावर जबर मारहाण केली. पत्नीला वाचवण्यासाठी पती मध्ये पडले असता, त्यांनाही बेदम मारहाण करण्यात आली. इतक्यावरच न थांबता, आरोपीने मुलगा तुषार आणि विशाल, पत्नी सविता आणि विष्णू ठेंग यांना बोलावून घेत सर्वांनी मिळून बेकायदेशीर जमाव जमवून पती-पत्नीला लाठ्याकाठ्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी वैशाली ठेंग यांनी रायपूर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अशोक साहेबराव ठेंग, विशाल अशोक ठेंग, तुषार अशोक ठेंग, सविता अशोक ठेंग आणि विष्णु भगवान ठेंग (सर्व रा. वाघापूर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, १८९ (२), १९०, ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (२), ३५१ (३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार दशरथ शितोळे हे करीत आहेत.

