क्राईम जगत

रक्तपात: जुन्या वादातून दोन तरुणांवर चाकूने हल्ला

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): जिल्ह्यातील सिंदखेड राजा शहरातील ‘किरण बार’ समोर किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या हाणामारीत होऊन एका तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी आलेल्या साक्षीदारावर आरोपींनी चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना नुकतीच समोर आली. याप्रकरणी सिंदखेड राजा पोलिसांनी आरोपी महेश ज्ञानदेव सोनुने याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
सावखेड तेजन येथील रहिवासी असलेले सुभाष कारभारी जायभाये (वय ४४ वर्षे) हे २८ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास किरण बारसमोर उभे होते. त्यावेळी आरोपी महेश सोनुने आणि एका साक्षीदारामध्ये शाब्दिक चकमक सुरू होती. वाद मिटवण्याच्या उद्देशाने सुभाष जायभाये हे दोघांना समजावून सांगण्यासाठी मध्ये गेले असता, आरोपीने संतापून फिर्यादीला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद नको म्हणून सुभाष जायभाये घटनास्थळावरून मोटारसायकलने काढता पाय घेतला. त्यावेळी आरोपीने त्यांची गाडी अडवून पाठीमागून येऊन त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले. त्यांना वाचवण्यासाठी आणि आरोपीला पकडण्यासाठी घटनास्थळी असलेले साक्षीदार धावून आले असता, आरोपीने त्यांच्यावरही चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादी आणि साक्षीदार दोघेही जखमी झाले आहेत. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच सिंदखेड राजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी सुभाष जायभाये यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिंदखेड राजा पोलिसांनी आरोपी महेश ज्ञानदेव सोनुने याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम १२६ (२), ११८ (१), ११५ (२), ३५२ व ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार प्रभाकर सानप हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *