खोट्या तक्रारीद्वारे जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करा
नदीम शेख
चांडोळ (प्रतिनिधी): गेल्या अनेक वर्षांपासून गुण्यागोविंदाने राहणाऱ्या समाजात विष पेरण्याचे काम काही लोकांकडून होत असल्याचा गंभीर आरोप करत, रुईखेड मायांबा येथील मागासवर्गीय समाज आणि ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. किरकोळ वादाचे भांडवल करून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींविरुद्ध कडक कारवाई करावी, या मागणीसाठी आज ५ मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे.
रुईखेड मायांबा येथे काही दिवसांपूर्वी केवळ नळाचे पाणी सोडण्यावरून ‘भागवत’ नावाच्या व्यक्तीचा पाणी सोडणाऱ्या व्यक्तीशी वाद झाला होता. हा वाद अगदी शुल्लक स्वरूपाचा होता आणि गावकरी व लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी करून तो मिटवलाही होता. मात्र, या वादाचे रूपांतर नंतर गंभीर तक्रारीत करण्यात आले. भागवत याचा मेहुणा जगदीश गायकवाड आणि बहीण उमा गायकवाड (रा. इब्राहिमपूर, जि. जालना) यांनी या वादात उडी घेतली. त्यांनी धाड पोलीस स्टेशनला गावातील अनिल शामराव फेपाळे, रवींद्र प्रकाश गिरी आणि विकास भारती यांच्या विरोधात खोटी तक्रार दाखल केली. ही तक्रार केवळ वैयक्तिक वादातून नसून जातीय रंग देऊन समाजमन बिघडवण्याच्या उद्देशाने केली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
संबंधित व्यक्ती केवळ तक्रार देऊन थांबल्या नाहीत, तर त्यांनी बुलढाणा येथे उपोषणाची धमकी देऊन सोशल मीडियावर चुकीच्या पोस्ट व्हायरल केल्या आहेत. या माध्यमातून गावातील शांतता भंग करण्याचा आणि सरपंच तसेच स्थानिक ठाणेदारांची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. “आमच्या गावात कोणताही जातीवाद नाही. मराठा समाज आणि मागासवर्गीय समाज पिढ्यानपिढ्या एकत्र राहतो. पण बाहेरून आलेल्या व्यक्तींनी गावातील तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करून जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला आहे,” असे निवेदनात म्हटले असून “आमच्या समाजाच्या नावाचा वापर करून स्वतःचा स्वार्थ साधणाऱ्या आणि समाजाची बदनामी करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी,” अशी आग्रही मागणी लिलाबाई काकफळे, संतोष ब्राह्मणे, संजय खंडागळे, विशाल काकफळे, विशाल खंडागळे, सुनिता खंडागळे, कमल महाले, विष्णू काकडे, राहुल काकडे, संदीप शेळके, विकास काकफळे, सागर काकफळे, विनोद काकफळे, सिद्धार्थ मगर, अजय काकफळे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

